भारतातील सर्वात मोठी बंडखोरी शरद पवार गटात होणार?; परिवर्तन रॅलीतून नेत्यांचाच इशारा काय?

| Updated on: Oct 11, 2024 | 4:23 PM

"शरद पवारांनी इंदापुरातला निर्णय बदलला नाही तर भारतातली सगळ्यात मोठी बंडखोरी या इंदापुरात झाल्याशिवाय राहणार नाही. सांगली पेक्षा मोठा पॅटर्न इंदापूरमध्ये दिसणार. आम्ही एकत्र बसू आणि अपक्ष उमेदवार देऊ", असा मोठा इशारा शरद पवार गटाचे नेते तथा सोनई ग्रुपचे संस्थापक दशरथ माने यांनी दिला आहे.

भारतातील सर्वात मोठी बंडखोरी शरद पवार गटात होणार?; परिवर्तन रॅलीतून नेत्यांचाच इशारा काय?
शरद पवार
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात म्हणजेच शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर आता इंदापुरातून मोठी बातमी समोर येत आहे. हर्षवर्धन पाटील यांना भाजपकडून इंदापुरातून उमेदवारी मिळणार नसल्याने त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केलाय. पण हर्षवर्धन पाटील यांना आपल्या पक्षात प्रवेश दिल्याने इंदापुरातील शरद पवार गटाचे स्थानिक नेते नाराज झाले आहेत. या नेत्यांनी आज इंदापुरात भव्य मेळावा घेत प्रचंड शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी शरद पवार गटाचे नेते तथा सोनई ग्रुप संस्थापक दशरथ माने यांनी पक्षप्रमुख शरद पवार यांना मोठा इशारा दिला. हर्षवर्धन पाटील यांना इंदापुरातून उमेदवारीचा निर्णय शरद पवारांनी बदलला नाही तर भारतातील सर्वात मोठी बंडखोरी इंदापुरात होईल, असा मोठा इशारा दशरथ माने यांनी दिला आहे.

“माझ्या राजकीय 35 वर्षाच्या कारकिर्दीत एवढी मोठी सभा पहिल्यांदाचं बघितली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेलादेखील एवढे नागरिक जमत नाहीत. खासदार सुप्रिया ताई म्हणाल्या होत्या इंदापूरला महिला जमत नाहीत. जरा हे महिलांचं मोहोळ बघा. हे (हर्षवर्धन पाटील) पक्षात शिरले. आमच्या शरद पवारांचा तंबूच घेऊन गेले, पण इथे बांबू आहेत ना. अजूनही विनंती आहे. ही गर्दी पाहा आणि निर्णय बदला. निर्णय बदलला नाही तर भारतातली सगळ्यात मोठी बंडखोरी या इंदापुरात झाल्याशिवाय राहणार नाही. सांगली पेक्षा मोठा पॅटर्न इंदापूरमध्ये दिसणार. आम्ही एकत्र बसू आणि अपक्ष उमेदवार देऊ”, असा मोठा इशारा सोनई ग्रुपचे संस्थापक दशरथ माने यांनी दिला.

‘आम्ही काय फक्त गवत उपटत राहायचं का?’

“सुप्रिया ताई अजूनही ऐका निर्णय बदला. तो चांगला दिसतो, उंच दिसतो. पण मग त्याला आमच्या बोकांडी का बसवता? त्याला त्या पंतप्रधानच्या मोदीच्या ठिकाणी नेवून बसवा की. हा आमच्या तंबूत का घुसतोय? सगळ्या पक्षाचं थोडंथोडं खातोय, अशी टीका दशरथ माने यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर केली. “साहेब म्हणत होते की, नवीन चेहऱ्यांना संधी देईन. मग ही असली कशाला घेताय? आम्ही काय फक्त गवत उपटत राहायचं का?”, असा खोचक सवाल दशरथ माने यांनी शरद पवारांना उद्देशून केला. “उद्रेक झालाय. ते म्हणतात, आम्हाला पोलिसांचा रिपोर्ट आलाय. हर्षवर्धनचा रिपोर्ट चांगलाय. अहो ते सगळ्यांना मॅनेज करतंय. ह्या स्वाभिमानी जनतेने ठरवलंय, ह्या इंदापूर तालुक्यात परिवर्तन करणारच”, असं दशरत माने म्हणाले.

‘आमच्यामध्ये दोनच उमेदवार’

या कार्यक्रमानंतर शरद पवार गटाचे नेते भरतशेठ शहा यांनी प्रतिक्रिया दिली. “आजचा मेळावा जनतेचा विचार समजून घेण्यासाठी होता. आमच्यात मतभेद नाहीत. आमच्यामध्ये दोनच उमेदवार आहेत. यापैकी कोण उभा राहणार? याचा निर्णय लवकरच जाहीर होईल. अजून काही निर्णय होत नाही तोपर्यंत या दोन्हीपैकी एक उमेदवार उभा राहील हे नक्की. पक्ष चालवताना काही निर्णय नाईलाजाने घ्यावे लागतात. पण सुप्रिया सुळे आणि शरद पवारांनी जनतेचा कौल पाहिला तर ते त्यांचा निर्णय बदलू शकतात. आम्हाला परिवर्तन पाहिजे”, असं भरतशेठ शहा म्हणाले.

‘निर्णय नाही बदलला तर अपक्ष ही भूमिका’

शरद पवार गटाचे नेते प्रविण माने यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. “पूर्ण इंदापुरामध्ये आज ऐतिहासिक सभा झाली. याआधी कधीच एवढी मोठी सभा झालेली नाही. जनतेचा प्रचंड प्रतिसाद होता. जेव्हा असा प्रतिसाद असतो तेव्हा एक वेगळा साऊंड असतो. तो लोकसभा निवडणुकीत आपण पाहिलेला आहे. आज लोकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे. आव्हानानंतर तीन दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणावर जनता या ठिकाणी आली आणि जनतेने आपला कौल दिलेला आहे. सुप्रिया सुळे ताई आणि शरद पवार आम्हाला कालही दैवत होते, आजही आहेत आणि उद्याही राहणार आहेत. आजच्या जनतेचा प्रतिसाद बघून निर्णय नाही बदलला तर अपक्ष ही भूमिका राहील. जनतेचा प्रतिसाद आहे तो नाकारू शकत नाही”, अशी भूमिका प्रविण माने यांनी मांडली.