हडपसर विधानसभा मतदारसंघांचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार प्रशांत जगताप यांच्या प्रचारार्थ शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची कात्रजमध्ये जाहीर सभा पार पडली. यावेळी जयंत पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांना पक्षप्रवेशाची खुली ऑफर दिली. “वसंत मोरे तुमच्या हातात आता मशाल आहे. तुमच्या हातात आम्ही कधीही तुतारी देऊ शकतो”, असे स्पष्ट संकेत जयंत पाटील यांनी दिले. त्यामुळे वसंत मोरे आगामी काळात राष्ट्रवादी शरद पवार गटात जाणार का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, यावेळी समालोचकाने गुलाबी शर्ट घातलेला बघायला मिळाला. त्यावर जयंत पाटील यांनी हसतहसत आक्षेप नोंदवला. यानंतर जयंत पाटील यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.
“हडपसर विधानसभा मतदारसंघात प्रशांत जगताप यांना शरद पवार यांनी उमेदवारी दिलीय. ते महाराष्ट्रातील एकमेव शहर अध्यक्ष आहेत जे शरद पवारांसोबत राहिले. प्रशांत जगताप यांनी स्पष्ट सांगितलं, मला तिकडं येणं शक्य नाही. मला परत फोन करू नका. लोकसभेनंतर महाराष्ट्रातील सरकार घाबरलं आणि म्हणेल त्या गोष्टी करायला सुरु केलं. आमचं घड्याळ चोरीला गेलेय, हा आमचा प्रॉब्लेम झालाय. चोरीला गेलेलं घड्याळ आम्हाला दिसत आहे. शरद पवारांनी त्या घड्याळाचे काटे थांबवले आहेत”, असं जयंत पाटील म्हणाले.
“पुणे शहरातील ट्रॅफिकच्या नावावर सत्ता भोगली, पण प्रश्न सुटले नाहीत. पुणे शहराची नवी ओळख ड्रग्सचे शहर होतेय की काय? अशी भीती आहे. कोयता गँग देखील पुण्यात आहे. ह्यांना कोयता गँग कंट्रोल होत नाही आणि मग राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेचे काय?”, असा सवाल जयंत पाटील यांनी केला.
“भाजपकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला जातोय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील वक्तव्य केलं. शिवाजी महाराजांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. डबल इंजिन सरकारला दिल्लीत कोणीही विचारत नाही. पावसाळी अधिवेशनात सरकाने एक कायदा आणलाय. फडणवीस कायदा. ह्या कायद्यानुसार तुमचं घर-दार जप्त करू शकतात. महाराष्ट्रात कोणी आंदोलन केलं तर त्याला आतमध्ये टाकायचं”, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.