Maval Assembly Constituency: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट तयार झाले. अजित पवार यांनी शरद पवार यांच्यापासून वेगळी भूमिका घेऊन महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. परंतु शरद पवार यांनी महाविकास आघाडीसोबत राहणेच पसंत केले. अजित पवार यांच्यासोबत जवळपास ४० आमदार बाहेर पडले. पक्ष सोडून गेलेल्या बंडखोर आमदारांविरोधात शरद पवारांनी दंड थोपटले आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत त्या आमदारांना धडा शिकवण्याचा चंग शरद पवार यांनी बांधला आहे. पहिल्या टप्प्यात शरद पवार यांनी वीस जागांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी अजित पवार यांच्या आमदारांविरुद्ध शरद पवार तरुण उमेदवार रिंगणात उतरवणार आहे.
शरद पवार यांनी त्या बंडखोर आमदारांविरोधात रणनिती तयार केली आहे. त्यासाठी काही जागा निवडल्या आहेत. त्यामध्ये मावळातील जागा सुद्धा हेरली आहे. त्यामुळे मावळ तालुक्यात शरद पवार गटातील राष्ट्रवादी कार्यकर्ते जोमात कामाला लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष दत्ता पडवळ यांनी सूचक विधान केले आहे. शरद पवार साहेबांचा शब्द अंतिम असणार आहे. साहेबांनी लढ म्हटल्यावर आपण नक्कीच मैदानात उतरणार असल्याचे त्यांनी म्हटले.
मावळ विधानसभा जागा महायुतीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे जात आहे. महाविकास आघाडीतही ही जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळावी यासाठी आम्ही आग्रही आहोत, असे दत्ता पडवळ यांनी सांगितले.
शरद पवार गटाच्या तयारीबाबत अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके म्हणाले की, लोकशाहीत कोणीही निवडणूक लढवू शकतो. प्रत्येकाला संविधानाने अधिकार दिले आहे. आपण कितीही चांगले काम केले तरी बिनविरोध निवडून येऊ शकत नाही. मावळ विधानसभा मतदारसंघात विविध पक्षातून अनेक इच्छुक आहेत. त्याच बरोबर किती अपक्ष उभे राहतील ते सांगता येणार नाही, असे आमदार सुनील शेळके यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मावळात मोठी रंगत पहायला मिळणार यात कोणतीही शंका नाही.