पुणे : मनसेच्या हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठनाला आता राष्ट्रवादीने (NCP) प्रत्युत्तर देण्याचे ठरवले आहे. राष्ट्रवादीकडून उद्या इफ्तार पार्टीचे (Iftar party) आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हनुमान मंदिरात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. साखळीपीर हनुमान मंदिरात ही इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली आहे. हनुमान जयंतीच्या प्रसादाने मुस्लीम नागरिक आपला रोजा सोडणार आहेत. राष्ट्रवादीच्या शिवानी माळवदकर यांच्याकडून या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. मनसेच्या भोंग्यानंतर आता रोज नवनवीन राजकारण पाहायला मिळत आहे. सध्या रमजान सुरू असल्याने कोणताही वाद नको, म्हणून मनसे नेते वसंत मोरे यांनी आपली भूमिका मांडली. मात्र राज ठाकरेंच्या भेटीनंतर आता ते काय करतात, याविषयी त्यांनी अजून सांगितलेले नाही. उद्या राज ठाकरे हनुमानाचा महाआरती करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी इफ्तार पार्टी करणार आहे. त्यामुळे पुण्याचे राजकारण ढवळून निघणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून पुणे दौऱ्यावर आहेत. तर उद्या संध्याकाळी हनुमान मंदिरात राज ठाकरे महाआरती करणार आहेत. राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्यासाठी मनसेची जोरदार तयारी सुरू आहे. मशिदीवरचे भोंगे काढावे अन्यथा त्यासमोर दुप्पट आवाजाने हनुमान चालिसा लावणार, अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली होती. त्यापार्श्वभूमीवर त्यांच्या पुणे दौऱ्याची उत्सुकता आहे. ते पुण्याकडे रवानाही झाले आहेत.
मशिदीवरचे भोंगे काढावे अन्यथा त्यासमोर दुप्पट आवाजाने हनुमान चालिसा लावणार, या राज ठाकरेंच्या भूमिकेचा राष्ट्रवादीने विरोध केला आहे. त्यांच्या या भूमिकेनंतर राष्ट्रवादीने आंदोलनही केले होते. सध्या रमजान सुरू आहे. त्यामुळे वातावरण शांत राहावे, ही राष्ट्रवादीची भूमिका आहे, असे राष्ट्रवादीने म्हटले आहे. आता उद्या खालकर चौकातल्या हनुमान मंदिरात राज ठाकरे हनुमान महाआरती करतील, तर साखळीपीर हनुमान मंदिरात राष्ट्रवादी इफ्तार पार्टी करणार आहे.