पुणे : कसबा पोटनिवडणुकीत (Kasba by election) आधीच अनेक स्थानिक वाद असताना त्यात अभिजीत बिचुकलेंची (Abhijit Bichukale) भर पडलीय. अभिजीत बिचुकलेंवर अॅट्रॉसिटी दाखल करण्याची तक्रार लहुजी छावा संघटनेनं दिलीय. आणि दुसरीकडे पुण्यातल्या पुढाऱ्यांनी षडयंत्र रचल्यामुळे बिचुकले पोलीस संरक्षणाची मागणी करतायत. नेमका वाद सुरु झाला बिचुकलेंचा अर्ज भरण्यापासून. काल कुटुंबासह अभिजीत बिचुकले अर्ज भरण्यासाठी पोहोचले. कसब्यातून उमेदवारी भरत असल्यामुळे कसबा मतदारसंघाचे प्रश्न काय? कसबा मतदारसंघ नेमका कसा आहे? असे काही प्रश्न पत्रकारांनी विचारले. त्यावर बिचुकलेंचा पारा चढला.
याचदरम्यान एका पत्रकाराच्या प्रश्नावरुन बिचुकलेंची बाचाबाची झाली. शब्दाला शब्द वाढला. आणि तेच प्रकरण आता तापू लागलंय.
आतापर्यंत अभिजीत बिचुकलेंनी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीपासून ते पदवीधर आमदारापर्यंतच्या निवडणुकीत एकूण ८ ते ९ वेळा अर्ज केले आहेत.
2004 बिचुकलेंनी सातारा विधानसभची निवडणूक लढवली.
2009 पुन्हा सातारा विधानसभा
2014 उदयनराजेंविरोधात सातारा लोकसभेतून बिचुकले उमेदवार होते
2014 सांगली लोकसभेतूनही बिचुकलेंनी अर्ज भरला
2019 वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढवली
2020 मध्ये पदवीधर निवडणुकीत अर्ज भरला. मात्र उमेदवार होऊ इच्छिणाऱ्या बिचुकलेंचं नाव मतदान यादीतून गायब होतं
2021 मध्ये पंढरपूर पोटनिवडणूक
2022 मध्ये कोल्हापूर उत्तर पटोनिवडणुकीसाठी तयारी केली
त्यानंतर 2022 मध्ये राष्ट्रपतीपदासाठी बिचुकलेंनी अर्ज करण्याची तयारी केली होती. मात्र अर्जासाठी किमान 9 खासदारांचा पाठिंबा लागतो. म्हणून जर त्यावेळी शरद पवारांनी पाठिंबा दिला असता, तर कदाचित चित्र वेगळं असतं, असं बिचुकले म्हणाले होते.
अभिजीत बिचुकलेंचा कॉन्फिडन्स भल्या-भल्यांना घाम फोडतो. कधी बिचुकले सलमान-शाहरुखशी पंगा घेतात. कधी नायक सिनेमातला एका दिवसाचा मुख्यमंत्री होण्याची इच्छा वर्तवतात. त्यांच्या दाव्यानुसार 2019 ला बिचुकलेच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवणार होते, मात्र तेव्हा संधी हुकल्यामुळे 2024 साठी त्यांनी तयारी सुरु केलीय.
याआधीच्या निवडणुकांवेळी बिचुकलेंची चर्चा अर्ज भरताना असायची. मात्र कसबा ही पहिली निवडणूक जिथं अर्ज भरल्याच्या दुसऱ्या दिवशीही बिचुकले चर्चेत आहेत.