पुणे | 22 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहराचा विस्तार वाढल्यानंतर सार्वजनिक वाहतुकीची अधिक गरज निर्माण झाली. पीएमपीएमएलची बस हा आतापर्यंत एकमेव पर्याय पुणे शहरात होता. त्यामुळे शहरातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर गेल्या काही वर्षांपासून भर दिला जात आहे. पुणे मेट्रोचे दोन टप्पे १ ऑगस्टपासून सुरु झाले. पुणे शहरातील वनाज ते रूबी हॉल आणि पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी ते शिवाजीनगर या दोन मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करण्यात आले होते. त्यानंतर आता मेट्रोचा पुढील टप्पा कधी सुरु होणार? यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेतली.
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मेट्रोचा रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडीपर्यंतचा टप्पा सुरु होणार आहे. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी बैठक घेतली. या बैठकीत हा टप्पा डिसेंबरमध्ये सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे पुणेकरांना डिसेंबरपासून मेट्रोचा आणखी एक टप्पा मिळणार आहे. अजित पवार यांनी बैठकीत मेट्रोची कामे लवकर करण्याचे आदेश महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिले.
डिसेंबरमध्ये रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडीपर्यंत मेट्रो धावणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट हा टप्पा पूर्ण कधी होणार? याकडे लक्ष लागले आहे. सध्या पिंपरी-चिंचवड ते सिव्हिल कोर्ट अशी मेट्रो सुरु आहे. सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या मार्गाचे काम अपूर्ण आहे. या मार्गात भुयार आहे. येत्या एप्रिलमध्ये सिव्हील कोर्ट ते स्वारगेट भुयारी मार्ग होणार असल्याची माहिती बैठकीत दिली गेली. त्यामुळे पिंपरी चिंचवडवरुन स्वारगेट कमी वेळेत पोहचता येणार आहे.
पुणे मेट्रोला नागरिकांना चांगला प्रतिसाद दिला आहे. गणेशोत्सव काळात मेट्रोने उत्पन्नाचे नवीन विक्रम केले होते. या काळात रात्री उशिरापर्यंत मेट्रो सुरु ठेवण्यात आली होती. विसर्जनाच्या दिवशी रात्री दोन वाजेपर्यंत मेट्रो चालवण्यात आली. नागरिकांकडून मेट्रोला मिळालेल्या प्रतिसादामुळे महामेट्रोने शनिवारी आणि रविवारी तिकीट दरात ३० टक्के सवलत दिली आहे. तसेच विद्यार्थ्यांनाही सवलतीत प्रवास करता येत आहे.