अभिजित पोते, पुणे, दि. 20 फेब्रुवारी 2024 | पुणे शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. पुणे पोलीस गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी एक एक पाऊल उचलले जात आहेत. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी काही दिवसांपूर्वी गुन्हेगारांची परेड घेतली होती. तब्बल 200 ते 300 कुख्यात गुन्हेगारांची ओळख परेड करण्यात आली होती. त्यामध्ये गजा मारणे, नीरज घायवळ या कुप्रसिद्ध गुंडांचाही समावेश होता. आयुक्त अमितेश कुमार यांनी आता आपला मोर्चा पब आणि हॉटेलकडे वळवला आहे. या ठिकाणी होणारी गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पावले उचलली आहेत. पुणे शहरातील हॉटेल आणि पबसाठी पोलिसांनी नवीन नियमावली जाहीर केली.
हॉटेल आणि पबसाठी नवीन नियम आले आहेत. आता पुणे शहरातील पब आणि हॉटेल मध्यरात्री दीड वाजेनंतर सुरु ठेवता येणार नाही. या व्यवसायाला दीड वाजेपर्यंतच परवानगी दिली आहे. या नियमाचे पालन न करता उशिरापर्यंत हॉटेल, पब सुरू ठेवणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.
हॉटेलमध्ये बाहेरील कलाकार किंवा डीजे येणार असल्यास त्याची माहिती पोलिसांना देणे सक्तीचे केले आहे. हॉटेल आणि पबमधील स्वच्छतागृह वगळून सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक करण्यात आला आहे.
हॉटेलमध्ये प्रवेश करणाऱ्या तसेच बाहेर पडण्याच्या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे लावावी लागणार आहे. तसेच सीसीटीव्ही चित्रीकरणातील डेटा साठविण्यासाठी दोन डीव्हीआर यंत्रे बसवावी लागणार आहे. या उपाय योजनांमुळे पुणे शहरातील गुन्हेगारी कमी होण्याचा विश्वास पोलिसांना आहे.
हॉटेल आणि पबमधील कर्मचारी, सुरक्षारक्षकांसाठी नियमावली केली आहे. या कर्मचाऱ्यांची चारित्र्यपडताळणी करावी लागणार आहे. कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल असल्यास त्याला कामावर ठेवण्यासाठी पोलिस उपायुक्तांची परवानगी आवश्यक असणार आहे. तसेच हॉटेलमध्ये धुम्रपानासाठी (स्मोकिंग झो) स्वतंत्र जागा तयार करावी लागणार आहे.