पुणे : जिल्ह्यात नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुखांनी लेखी आदेश काढले आहेत. तसेच पुण्यासह ठाणे, नागपूरमध्येही नवे नियम लागू करण्यात आले आहेत. पुण्यात लग्न समारंभ, जिम, स्पा, रेस्टॉरंट, हॉटेल्स यांच्या वेळा आणि किती क्षमतेने परवानगी असणार याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे, तसेच राजकीय, धार्मिक कार्यक्रमात किती लोकांच्या उपस्थितीला परवानगी असणार याबाबतही स्पष्ट करण्यात आले आहे.
पुण्यात काय निर्बंध असणार?
पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण
राज्यात ओमिक्रॉनचा प्रसार हा वेगाने वाढत चालला आहे, त्यामुळे राज्य सरकार पुन्हा काही जिल्ह्यात निर्बंध लागू करत आहे. ऑमिक्रॉनचा पहिला रुग्ण कल्याण-डोंबिवलीत आढळून आल्यानंतर ओमिक्रॉनने पुण्यतही शिरकाव केला. त्यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागात ओमिक्रॉनचे रुग्ण जलदगतीने वाढताना दिसून आले, त्यामुळेच राज्य सरकारने आता नाताळाच्या सणाला होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि ओमिक्रॉनचा फैलाव रोखण्यासाठी पुन्हा निर्बंध कडक केले आहेत.
पुण्यात रात्रीची जमावबंदी लागू
पुण्यातली नाईट लाईफ नेहमीच चर्चेत असते, अनेक हॉटेल, पब, बारमध्ये अनेक कार्यक्रमात लोकांची गर्दी होते, हीच गर्दी टाळण्यासाठी पुण्यात रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही, लोक नियम मोडताना दिसून आले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. तसेच लग्न समारंभालाही काही लोकांची मर्यादा घालून देण्यात आली आहे. तसेच जिम, रेस्टॉरंट, स्पा, हॉटेलमध्ये 50 टक्के उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. ओमिक्रॉनमुळे जगावर तिसऱ्या लाटेची टांगती तलवार आहे, भारतालाही तिसऱ्या लाटेचा धोका आहे, त्यामुळे सर्वच राज्यात लसीकरणावर भर दिला जात आहे. त्यासाठी सरकार कठोर पावलं उचलत आहे. सरकारकडून वारंवार नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन होऊ द्यायचं नसेल तर नियमांचे काटेकोर पालन करा.