पुणे : राज्यात मान्सून ११ जून रोजी दाखल झाला होता. आता २२ जून आले आहे. मान्सून दाखल होऊन दहा दिवस झाले आहे. परंतु पाऊस नाही. शेतकरी पावसाची वाट पाहत आहे. परंतु मान्सूनला बिपरजॉय चक्रीवादळाने अडथळा आणला. या चक्रीवादळाने आपला परिणाम दाखवला. बिपरजॉयमुळे गुजरात अन् राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस झाला होता. तर काही भागात उष्णतेची लाट आहे. त्याचवेळी महाराष्ट्रात मान्सूनची वाटचाल थांबली. १५ जून रोजी राज्यात सर्वत्र दाखल होणारा मान्सून अजूनही आला नाही. परंतु आता त्याची जास्त काही काळ वाट पाहावी लागणार नाही, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.
महाराष्ट्रात गेल्या दहा दिवसांपासून रखडलेला मान्सून लवकरच वेग घेणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. सध्या मान्सूनच्या वाऱ्यांना पुढील वाटचाल अनुकूल झाली आहे. बिपरजॉय चक्रीवादळ पुढे सरकल्याने मान्सूनचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे मान्सून राज्यात दाखल होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याच्या मुंबई आणि नागपूर केंद्राने यासंदर्भात माहिती दिली आहे.
21 Jun: @RMC_Mumbai & @imdnagpur ने 23 जूनपासून कोकणातील काही भागात, मध्य महाराष्ट्र व विदर्भात ; 24-25 जूनपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे.
मराठवाडा मधील काही भागात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता.
IMD GFS guidance for 23 -25 June indicates same. pic.twitter.com/ZzbS3WRNjI— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 21, 2023
भारतीय हवामान विभागाच्या पुणे विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. त्यात म्हटले आहे की, 23 जूनपासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात पाऊस पडणार आहेत. तसेच 24 ते 25 जूनपर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार मराठवाडा आणि विदर्भात 22 ते 23 जूनपर्यंत पाऊस पडणार आहे. त्यानंतर 25 जूननंतर राज्यात सर्वत्र चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. प्रत्यक्षात पावसाचे उशिरा आगमन झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. मृग नक्षत्र लागला आहे अन् जून महिना संपत आहे. तरीही पाऊस नाही. मात्र आता जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून सर्वत्र दाखल होणार आहे. पाऊस पडल्यावर पुरेशी ओल झाल्याशिवाय पेरणी करु नये, असे कृषी विभागातील तज्ज्ञांनी म्हटले आहे. यामुळे पाऊस पडताच शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे. यंदा जून महिन्यात देशभरात पाऊस खूप कमी झाला आहे. टक्केवारीत हा पाऊस फक्त 37 टक्के आहे.