योगेश बोरसे, पुणे | 3 नोव्हेंबर 2023 : पुणे पोलिसांनी एका मोटारसायकल चोरी प्रकरणाचा तपास करताना दोघांना अटक केली होती. 18 जुलै 2023 रोजी घडलेल्या या घटनेतील दोघे आरोपी दशतवादी निघाले होते. महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान आणि महम्मद युनूस महम्मद याकूब साकी अशी त्यांची नावे आहेत. त्यावेळी त्यांचा तिसरा साथीदार मोहम्मद शाहनवाज आलम हा फरार झाला होता. आता शाहनवाज याला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बेडया ठोकल्या आहे. त्याच्यावर तीन लाखांचे बक्षिस होते. पुणे इसिस मॉड्यूल प्रकरणात ही आठवी अटक आहे. त्याच्या चौकशीतून महत्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.
मोहम्मद शाहनवाज आलाम हा झारखंडमधील हजारीबाग येथील राहणार आहे. पुणे इसिस मॉड्यूल प्रकरण उघड झाल्यानंतर तो फरार झाला होता. त्याच्याविरुद्ध दिल्लीत दहशवादी कृत्य रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचे दोन साथीदार पुणे पोलिसांना 18 जुलै रोजी मिळाले होते. त्यावेळी तो फरार झाला होता. दिल्ली पोलीस दलाच्या विशेष तपास पथकाने त्याचा शोध सुरु केला होता. गेल्या महिन्यात दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने त्याला पकडले होते. आता दिल्ली पोलिसांकडून एनआयएने त्याला ताब्यात घेतले आहे.
मोहम्मद शाहनवाज आलम याने हत्यारे आणि विस्फोटक खरेदी केली होती. दिल्लीत एक खोली भाड्याने घेऊन तो राहत होता. पुणे पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या प्रकरणात त्याच्या दोन साथीदारांना अटक केली होती. त्यानंतर तो फरार झाला होता. त्याच्यावर तीन लाखांचे बक्षिस जाहीर करण्यात आले होते.
शाहनवाज याने बीटेक केले आहे. 2016 मध्ये त्याने नागपूर येथील एनआयटीमध्ये मायनिंग या शाखेत बीटेक केले. त्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी तो दिल्लीत गेला. दिल्लीत त्याचा इतरांशी संपर्क आला आणि तो दहशवादी कारवायांकडे वळाला. शस्त्र चालवण्याचे आणि स्फोटकांचा सराव वर्ग आयोजित करण्यात त्याचा सहभाग होता.