पुणे | 20 जुलै 2023 : पुणे शहरात बुधवारी मोठी कारवाई झाली. पुण्यात दीड वर्षांपासून राहत असलेल्या दोघांना अटक करण्यात आली. हे दोघेही दहशतवाद होते. जयपुरात सीरियल ब्लास्ट करण्याचा कट त्यांनी आखला होता. राष्ट्रीय तपास संस्थेने त्यांच्यांवर मोठे बक्षीस जाहीर केले होते. एनआयएच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत त्यांचा समावेश केला होता. परंतु दीड वर्षांपासून ते पुणे शहरात राहत असतानाही पोलिसांना थांगपत्ता लागला नव्हता. पोलिसांनी या दोघांकडून ड्रोनचे साहित्य, बनावट आधार कार्ड, स्फोटके सदृश्य गोळ्या, जिवंत काडतूस जप्त केले आहेत.
मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान (वय २३) आणि मोहम्मद युनुसमोहम्मद याकुब साकी (वय २४) हे दोघे मध्य प्रदेशातील रतलाममधील रहिवाशी आहेत. पुण्यातील कोंढवामध्ये गेल्या दीड वर्षांपासून ते राहत होते. मंगळवारी कोथरुड पोलीस ठाण्याचे बीट मार्शल प्रदीप चव्हाण आणि अमोल नझन गस्त घालत होते. त्यावेळी दुचाकी चोरी प्रकरणात दोघांना पकडले. त्यावेळी त्याचा तिसरा साथीदार मोहम्मद शहनवाज (वय ३२) फरार झाला. चौकशी केली असता ते दोघे घाबरले. मग पोलिसांना संशय आला. त्यांच्या घराची झडती घेतली. त्यावेळी संशयास्पद अनेक साहित्य मिळून आले.
राजस्थानमध्ये बॉम्ब स्फोट घडवण्याचा कट या दोघांनी आणि त्यांच्या साथीदारांनी आखला होता. हा प्रकार राजस्थान पोलिसांनी उघड केला. त्यानंतर हे फरार झाले होते. राजस्थान सरकारने हे प्रकरण एनआयएकडे दिले. या प्रकरणाची एनआयएने चौकशी सुरु केल्यानंतर ते दोघे फरार झाले. यामुळे त्यांची माहिती देणाऱ्यांना पाच लाखांचे बक्षीस एनआयएने जाहीर केले होते. आयसिसी या दहशतवादी संघटनेची शाखा असलेल्या सुफा संघटनेशी ते संबंधित होते.
आरोपींना न्यायालयात उभे केले असता त्यांना पोलीस कोठडी मिळाली आहे. त्यांची चौकशी एटीएस आणि एनआयएकडून केली जात आहे. त्यांच्या चौकीशीतून अनेक धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता आहे.