पुणे | 16 सप्टेंबर 2023 : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे पुणे शहरावर प्रेम आहे. पुणे शहरात आल्यावर ते पूर्वीचे पुणे आणि आताचे पुणे यावर चर्चा करत असतात. पुणे शहरातील प्रदूषण आणि वाहतूक कोंडीचा विषय त्यांनी चांदणी चौकातील उद्घाटनाप्रसंगी छेडला होता. आतापर्यंत पुणे सगळ्यांना सामावून घेत आहे, पण आता बस झाले, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. आता पुन्हा पुणे शहरातील प्रश्न मांडत नवीन व्हिजन नितीन गडकरी यांनी दिले.
क्रेडाईच्या वार्षिक सर्वसाधरण सभेत बोलताना नितीन गडकरी यांनी रोखठोकपणे पुणे वाढवणे आता थांबवा, असे सांगत नवीन व्हिजन मांडले. नितीन गडकरी म्हणाले की, पुणे शहराचा विस्तार आता थांबला पाहिजे. जसे मुंबईत नवीन मुंबई झाले, दिल्लीत नवी दिल्ली झाले तसे पुणे शहरात नवीन पुणे का नाही? आता नवीन पुणे उभारण्याचा विचार करुन पुणे शहरातील गर्दी रोखण्याची गरज आहे. आज प्रत्येक जण पुणे शहरात राहण्यात उत्सुक आहे.
शहरांकडे येणारे गर्दीचे लोंढे थांबायला हवे. आता आपण स्मार्ट सिटी नाही तर स्मार्ट व्हिलेजचा विचार करायला हवा. हे कसे करता येईल, त्याचा कसा फायदा होईल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. पुणे शहराच्या आजूबाजूला ५५ हजार कोटी रुपयांची विकास कामे सुरु आहे. शहराच्या चारी बाजूंना दुमजली आणि तीनमजली उड्डानपुलाचे नियोजन आहे. आता स्मार्ट व्हिलेज आणि नवीन पुणे उभारण्याची गरज आहे.
नागपूर-पुणे प्रवास साडेचार तासात होईल, असा रोड बांधणार आहे. समृद्धी महामार्गाप्रमाणे हा महत्वाचा प्रकल्प असणार आहे. यामुळे दोन मोठी शहरे जोडली जाणार आहे. पुणे शहरातील चांदणी चौकात पूल बांधला. त्यामुळे वाहतूक कमी होईल, असे वाटत होते. पण ती वाढली कारण गाड्या वाढत जात आहेत. त्यामुळे नवीन पूल झाल्यावर वाहतूक कोंडी कमी झाली नाही.