मुंबईः बारावीची परीक्षा (Exam) आणि त्या परीक्षेत मिळणारे गुण (Marks) म्हणजे विद्यार्थ्यांना अनन्यसाधारण वाटतात, पण आता एका एका गुणांसाठी धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. उत्तर (Answers) बरोबर असूनही ते लिहिण्याची पद्धत जर चुकीची असली तर बारावी सायन्स शाखेच्या विद्यार्थ्यांना बहुपर्यायी प्रश्नांसाठी असलेले 10 गुण आता गमवावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जीवशास्त्रातील या प्रश्नाच्या गुणांबाबत आता विद्यार्थ्यांना तणाव आला आहे. कारण याबाबत त्या त्या महाविद्यालयांना सूचना दिल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. गुणांबाबतचा निर्णय आता नियामकाना देण्यात आला आहे, त्यामुळे विद्यार्थी आता गोत्यात आले आहेत.
जीवशास्त्राच्या परीक्षेत पहिल्या प्रश्नात 10 गुणांचे एमसीक्यू (बहुपर्यायी प्रश्न) विचारण्यात आले होते. या प्रश्नाचे उत्तर लिहिताना विद्यार्थ्यांना केवळ पर्याय लिहिला असल्यास (a,b,c किंवा d यापैकी एक) अथवा फक्त उत्तर असल्यास तसेच पूर्ण वाक्यात उत्तर लिहून त्यात पर्याय (a,b,c किंवा d यापैकी एक) न लिहिल्यास शून्य गुण देण्याच्या सूचना परीक्षक आणि नियामकांना देण्यात आल्या आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑफलाईन परीक्षांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ज्युनियर कॉलेजमध्ये हजेरी लावून अभ्यास करण्यास फारच कमी वेळ मिळाला. त्यामुळे यंदा पेपर तपासताना कठोर होऊ नये अशा सूचना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नियामकांच्या बैठकीत देण्यात आल्या होत्या. मात्र जीवशास्त्र विषयाच्या मुख्य नियामकांना घेतलेल्या बैठकीत बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरे लिहिताना विद्यार्थ्यांची पद्धत चुकीची असल्यास गुण न देण्याच्या सूचना परीक्षकांना देण्यात आल्या आहेत.
त्यामुळे नेमके काय करावे असा प्रश्न परीक्षक आणि नियामकांसमोर आहे. याउलट रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र विषयांच्या परीक्षेत विचारण्यात आलेल्या बहुपर्यायी प्रश्नांच्या उत्तराबाबत अशा प्रकारच्या कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत.
बारावीचे विद्यार्थी वर्षभर बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास करीत असतात. ज्युनियर कॉलेजस्तरावर विविध प्रश्नसंच सोडवून घेण्यात येतात. त्यावेळी आदर्श उत्तरपत्रिका कशी असावी याविषयी विद्यार्थ्यांना अवगत करणे आवश्यक असल्याचे मत बारावीच्या शिक्षकांनी व्यक्त केले.
जीवशास्त्राच्या उत्तरपत्रिकेत बहूपर्यायी प्रश्नांची उत्तरे लिहिताना ती कोणत्या पद्धतीने असावी याविषयी काही कॉलेजमधून विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आलेली नाही. याशिवाय विद्यार्थी जेव्हा पूर्ण वाक्यात उत्तर लिहितात त्यावेळी त्या वाक्याच्या मध्येच योग्य पर्याय लिहिणे म्हणजेच (a,b,c किंवा d) योग्य ठरेल का असा सवालही शिक्षकांनी उपस्थित केला होता.
मुख्य नियामकांच्या बैठकीत पेपर तपासणीबाबत दिलेल्या सुचनानुसार उत्तरपत्रिका तपासल्या जातात. शिवाय ही गोपनीय बाब असल्याचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले.
संबंधित बातम्या
Uttar Pradesh : यूपीच भाजपचं यंतिस्तान झिंदाबाद, नवे उमेदवार जोमात, जुने जाणते कोमात?