पुणे: भाजप नेते अमित शहा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची काल दिल्लीत भेट झाली. बऱ्याच कालावधीनंतर फडणवीस आणि शहा यांची भेट झाली. त्यामुळे या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. त्यातही भाजपने विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रमोशन दिल्यानंतर या भेटीची अधिकच चर्चा सुरू होती. ही राजकीय भेट असल्याचंही सांगितलं जात होतं. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी ही राजकीय भेट नसल्याचं स्पष्ट केलं. आमच्या नेत्यांना आम्ही नेहमी भेटतो, त्यानुसार आताही भेटल्याचं ते फडणवीस म्हणाले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत आहेत. चंद्रकांत पाटील यांनी परवाच अमित शहांची भेट घेतली. तर फडणवीसांनी काल देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन त्यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. या भेटीत राज्यातील राजकीय घडामोडी आणि भाजपच्या संघटनात्मक बाबींवर चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यानंतर फडणवीस आणि पाटील पार्टी मुख्यालयात गेले. त्या ठिकाणी त्यांची भाजप नेते बीएल संतोष आणि सीटी रवी यांच्याशी तब्बल पाच तास चर्चा झाली. मात्र, या भेटीपेक्षा फडणवीस आणि शहा यांच्या भेटीचीच सर्वाधिक चर्चा रंगली.
काल मी अमित शहा यांना भेटलो. दिल्लीत आल्यावर आमच्या नेत्यांना आम्ही भेटतच असतो. दिल्लीत कोणतीही राजकीय भेट नव्हती. संघटनात्मक बैठक होती. चंद्रकांत पाटील आणि दोघे होते. तीन-चार तास ही बैठक चालली. पण ही राजकीय भेट नव्हती, असं फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांना ठाकरे सरकारच्या कामगिरीबाबतही विचारण्यात आलं. त्यावर नेमकी सरकारची कामगिरी काय आहे की त्यावर बोलू? कामगिरी असते तिथे मूल्यमापन केलं जातं. पण कामगिरीच नाही तर मूल्यमापन कसे करणार? असा सवाल करतानाच तुम्ही सांगत असलेल्या सर्व्हेबाबत मला माहीत नाही. पण राज्यातील नंबर वनचा पक्ष भाजपच आहे, असं ते म्हणाले.
कालही देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधला होता. माझ्या दिल्लीवारीनंतर कुठल्या राजकीय चर्चेला उधाण आलं याची मला कल्पना नाही. मी इथे संघटनात्मक बैठकीसाठी आलो होतो. चंद्रकांतदादा आणि मी सीटी रवी तसेच बीएल संतोष यांच्याशी चर्चा केली. संघटनेची पुढची वाटचाल आणि त्याचा आढावा यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. तब्बल चार ते पाच तास ही बैठक चालली. या बैठकीत वेगळा काही अजेंडा नव्हता, असं ते म्हणाले. अमित शहा आमचे नेते आहेत. दिल्लीत आल्यावर त्यांची भेट घेतोच. त्यांच्याशीही चर्चा झाली. पक्षात कोणताही संघटनात्मक बदल होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.
संबंधित बातम्या:
एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप ताणला जातोय? अजित पवार म्हणतात, उद्या कोतवाल, पोलीस पाटीलही पुढे येतील