पुणे : राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर अनेक नेत्यांना ईडीची नोटीस पाठवून हादरवून सोडलं होते. त्यावरूनच विरोधकांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. देशातील अनेक नेत्यांना ईडीची नोटीस पाठवून त्यांना अडचणीत आणण्याचं काम भाजप करत असल्याची टीकाही भाजपवर त्यामुळेच केली जात होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनाही ईडीची नोटीस आता देण्यात आली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीनेही भाजपवर निशाणा साधत ईडी नोटीसीची खिल्ली जयंत पाटील यांनी उडवली आहे. त्यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, ईडीकडून मला आता दुसरी नोटीस दिली नाही तर तारीख बदलून मागितली होती ती बदलून दिली असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे आता पुन्हा त्यांनी तारीख बदलून नोटीस दिल्यामुळे तिकडे तर जावं लागेलच असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.
आमदार जयंत पाटील यांनी ईडीच्या नोटीसवर बोलताना सांगितले की, ईडी आता माझी चौकशी करतात की चहापाणी करतात हे पाहावं लागेल असं म्हणून त्यांनी खोचकपणे राजकारण्यांना आणि प्रशासनालाही त्यांनी टोला लगावला. यावेळी त्यांनी सांगितले की, मला जे प्रश्न विचारले जातील त्याची मी उत्तर देणारं आहे.
ईडीकडून पहिल्यांदा आमदार जयंत पाटील यांना नोटीस देण्यात आली त्यावेळी आणि आताही जयंत पाटील यांनी सांगितले की, माझ्या मालकीचं या पृथ्वी तलावर एकही घर नाही.
जे गावाकडचे घरं आहे ते आईकडून माझ्याकडे आले आहे. त्यामुळे माझ्या मालमत्तेविषयी ईडीचा काय तरी गैरसमज झालेला आहे का ? असा प्रतिसवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
आमदार जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले की, महाराष्ट्रातील जनता निवडणुकांची वाट बघते आहे. ज्यावेळी आगामी काळातील निवडणुका होतील त्यावेळी भाजपा मर्यादित जागांवरच निवडून येईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी राज्यात झालेल्या सत्ताबदलवर बोलताना त्यांनी शिवसेना आणि भाजपवरही जोरदार निशाणा साधला. एखाद्याचा पक्ष फोडून पक्ष हिरावून घेऊन ही सत्ता आणली जाते.
मात्र हा खूप मोठा विश्वासघात नाही का असा सवाल करत त्यांनी राज्यपालांनी सगळ्या घटनांची पायमल्ली करून सरकार बनवलं असल्याचा घणाघातही जयंत पाटील यांनी केला आहे. या बदलेल्या सरकारच्या गोष्टींना महाराष्ट्रातील जनताचं उत्तर देईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
तर शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना ते आमदार, मंत्री यांना कधीच भेटले नाहीत असा आरोप त्यांच्यावर केला जातो.
मात्र त्याविषयी बोलताना त्यांनी सांगितल की, कोरोनामुळं उद्धव ठाकरे यांना भेटायला मर्यादा आली हे खरं आहे. मात्र त्यांनी ते जाणीवपूर्वक केले नाही असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.
भाजपात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधून गेलेले आमदार असल्याचे सांगत महाराष्ट्रातील जनता जाहिरातीला भूलत नाही तसेच या सरकारमुळे महाराष्ट्रातील कोणताचं घटक समाधानी नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.