पुणे : पुणे शहरातील वाहतूक कोडींचा प्रश्न हा गंभीर आहे. पुणे शहरात वाहने सर्वात जास्त आहेत. परंतु रस्त्यांना मर्यादा आहेत. यामुळे आठ ते दहा किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी तासभर पुणेकरांना लागतो. परंतु ही समस्या लवकरच सुटणार आहे. त्यासाठी असलेल्या 27 हजार कोटींच्या प्रकल्पास सुरुवात होणार आहे. या प्रकल्पाच्या जमिनी अधिग्रहणासाठी पाच हजार जणांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. हवेली, भोर, मावळ आणि मुळशी या तालुक्यात ३२ गावांमधील शेतकऱ्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. या नोटिशांवर जुलै अखरेपर्यंत उत्तर मागवले आहे.
पुणे शहराभोवती 172 किलोमीटरच्या रिंगरोडचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया आता सुरु झाली आहे. प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम जानेवारी 2024 मध्ये सुरू होणे अपेक्षित आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून जमीन मालकांना नोटिसा दिल्या आहेत. भूसंपादन प्रक्रियेमुळे प्रत्यक्ष कामाला डिसेंबर किंवा जानेवारी 2024 मध्ये सुरुवात होणार आहे.
रिंगरोड प्रकल्पासाठी शहराला वेढलेल्या 87 गावांची एकूण 1900 हेक्टर जमिनीचे संपादन केले जाईल. या प्रकल्पासाठी 26 हजार 800 कोटी रुपये खर्च येईल, असा अंदाज आहे. प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी 5 हजार 800 कोटींचा निधी मिळाला आहे. प्रकल्पाचे काम मे 2026 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
रिंगरोड पिंपरी चिंचवड, चिंबळी, लोणीकंद, थेऊर, शिवापूर आणि पिरंगुट या भागांना जोडणार आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक कमी होईल. तसेच शहरातील रस्त्यांवरील कोंडी कमी होईल. या रिंगरोडमध्ये आठ उड्डाणपूल असणार आहेत. तसेच रेल्वेमार्गावर चार पूल उभारण्यात येणार आहे. सात मार्गिका, चौदा भूमिगत रस्ते आणि तेरा बोगदे रिंगरोडमध्ये आहेत.
पुणे शहरात मेट्रो सुरु झाली आहे. आता रिंग रोड होणार आहे. यामुळे पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत येत्या काही वर्षांमध्ये मोठा बदल होणार आहे. या बदलामुळे पुण्याची वाटचाल स्मार्टसिटीकडे होणार आहे. हे सर्व करताना पुणे शहर अपघात मुक्त कसे होणार? याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.