पुणे, दिनांक 15 जुलै 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे. मुंबईत आता जागतिक स्तरावरील दर्जेदार शैक्षणिक संस्था सुरु होणार आहे. यासंदर्भातील निर्णय मोदी मंत्रिमंडळाने बुधवारी घेतल्याची माहिती भाजप नेते अन् आमदार आशिष शेलार यांनी दिली. देशात 65 वर्षे काँग्रेस सरकार होते, परंतु मुंबईला काही मिळाले नाही, असा दावा शेलार यांनी केला आहे.
मुंबईला IIM म्हणजेच भारतीय व्यवस्थापन संस्था सुरु होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने या निर्णयास मान्यता दिली आहे. NITIE मुंबई ही देशातील २१ वी तर राज्यातील दुसरी आयआयएम असणार आहे. यापूर्वी राज्यात केवळ नागपूरसाठी आयआयएम होती. या निर्णयाबद्दल मुंबई भाजपकडून मोदी सरकारचे आभार मानले असल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले.
पवईत असणाऱ्या NITIE कॉलेजला IIM ची परवानगी मिळाली आहे. जगात नामवंत असणारी आयआयएमच्या 350 जागा मुंबईत मंजूर झाल्या आहेत. त्याला कॅबिनेटने मान्यता दिली असून संसदेच्या येत्या अधिवेशनात हे विधेयक मंजूर होईल. पण मुंबईमध्ये आयआयएम मिळाले तरी विरोधक गप्प का? या विषयावर ते बोलत का नाही? असे त्यांनी सांगितले.
देशाच्या इतिहासात शिक्षण पॉलिसी बदलण्याचे धाडस मोदी सरकारने केली आहे. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यश आहे. मोदी सरकारने शिक्षण धोरणात केलेले बदल विद्यार्थ्यांपर्यंत नेणार आहे. त्यासाठी भाजप प्रत्येक विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. मुंबईला सगळे मिळत आहे, या सगळ्या योजना जनतेपर्यंत नेणार असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
ज्यांना कावीळ झाले आहे, त्यांना सगळ पिवळ दिसते. आदित्य ठाकरे यांना काही होऊ नये, परंतु त्यांना राजकिय कावीळ झाली आहे, हे खरे आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना सगळे निर्णय विद्यार्थ्यांच्या विरोधात होत असल्याचे वाटतात.