पुणे | 22 ऑगस्ट 2023 : केंद्र शासनाने कांदाच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारले आहे. त्याविरोधात राज्यातील शेतकरी आक्रमक झाले आहे. राज्यात ठिकठिकाणी आंदोलने उभारली जात आहेत. नाशिकमधील बाजार समित्या सलग दुसऱ्या दिवशीही बंद आहेत. यामुळे मंगळवारी नाशिकमधील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात येणार आहे. दरम्यान पुणे येथील आळे फाटा येथे शेतकऱ्यांनी आंदोलन उभारले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व खासदार अमोल कोल्हे करत आहेत.
केंद्र सरकारच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असताना पुणे जिल्ह्यात शिरुरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांची साथ मिळाली आहे. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. गेली अनेक वर्ष आम्हाला अनुदान नाही. आमच्यावर अन्याय करु नका, असे शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले.
नाशिकच्या निफाड तालुक्यातील रुई गावात शेतकरी संघटनांच्या वतीने सरकारच्या कांदा निर्यात शुल्क वाढवण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी आपला कांदा रस्त्यावर फेकला. तसेच केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली? दरम्यान सरकारने हा निर्णय तातडीने मागे न घेतल्यास येणाऱ्या काळात आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आंदोलनासंदर्भात बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, धनंजय मुंडे यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांसमोर हा विषय मांडवा. मी स्वत: कांद्याचा हार घालून त्यांचा सत्कार करेन. राज्यातील सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन आहे की, आपला प्रश्न जो पर्यंत मार्गी लागत नाही तो पर्यंत सगळ्या मंत्र्यांचा सत्कार कांद्याचा हार घालून करा, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासाठी उपमुख्यमंत्री गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संपर्क साधला. फडणवीस सध्या जपानच्या दौऱ्यावर आहेत. जपानमधून त्यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी संपर्क साधला. केंद्र सरकारने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील, अशी घोषणा त्यांनी केली आहे.