पुणे: अँटालियाप्रकरणावरून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी नवा बॉम्ब फोडला आहे. अँटेलिया प्रकरणात मनसुख हिरेन यांची हत्या झाली नसती किंवा हिरेन यांनी पोलिसांकडे शरणागती पत्करली असती तर एका गुंडाचा फेक एन्काऊंटर करण्याचा सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांचा डाव होता. या गुंडाचा फेक पासपोर्ट तयार करून तो पाकिस्तानात जाऊन आल्याची एन्ट्रीही करण्यात आली होती, असा धक्कादायक दावा नवाब मलिक यांनी केला आहे. मलिक यांच्या या दाव्याने खळबळ उडाली आहे.
नवाब मलिक यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अँटालियाप्रकरणी धक्कादायक माहिती दिली. सीबीआय, ईडी आणि इतर तपास यंत्रणेबाबत ते कोणत्या पद्धतीने कामगिरी करत आहे हे लपून राहिलं नाही. अँटिलिया प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती आज ना उद्या समोर येणार आहे. या प्रकरणात एक फेक पासपोर्ट तयार करण्यात आला होता. एका छोट्यामोठ्या गुंडाच्या नावाने हा पासपोर्ट तयार केला गेला. त्यावर पाकिस्तानची एक्झिट आणि एन्ट्री दाखवण्यात आली होती. वाझे आणि परमबीर सिंगने हा फेक पासपोर्ट तयार केला होता. मनसुख हिरेनची हत्या झाली नसती किंवा हिरेन पोलिसांकडे शरण आला असता तर परिस्थिती वेगळी दिसली असती. त्या गुंडाचं फेक एन्काऊंटर करण्याचं षडयंत्रं होतं. वाझे आणि सिंग यांचं हे षडयंत्रं होतं. वाझेच्या घरातून हा फेक पासपोर्ट मिळाला आहे. पंचनाम्यात तो पासपोर्ट आहे. एनआयने ही माहिती उघड करावी, असं आवाहन मलिक यांनी केलं.
राज्य सरकारला दोन वर्ष झाली आहेत. पण या काळात सिंग सारख्या अधिकाऱ्याने गंभीर आरोप केले आहेत, असं मलिक यांना विचारण्यात आलं. त्यावर, हे सर्व पॉलिटिकली मोटिव्हेटेड होतं. अँटेलिया बाहेर बॉम्ब ठेवण्याचं कारस्थान वाझे आणि सिंग यांनी मिळून केलं होतं. सरकारला ब्रिफिंग करत असताना वेगळ्या पद्धतीने ब्रिफिंग दिली गेली. सिंग आणि वाझे हेच सरकारला ब्रिफिंग करत होते. त्यामुळे आम्ही ते अधिवेशनात मांडत होतो. हे दोघेही अधिवेशन सुरू असताना सरकारची दिशाभूल करत होते, असं त्यांनी सांगितलं.
हत्येच्या घटनेनंतरही वाझेंनी सरकारची दिशाभूल केली. सत्य समोर आल्यानंतर सिंग यांची बदली होम गार्डला करण्यात आली. बदली केल्यानंतर सिंग यांनी ईमेल द्वारे तक्रार दाखल केली. नंतर सीबीआय आली. गुन्हा दाखल केला. तेव्हा देशमुखांनी राजनीमा दिला. आता हे प्रकरण कोर्टात आहे. पण हा संपूर्ण विषय पॉलिटिकली मोटिव्हेटेड होता. चांदीवाल कमिशनचं कामकाज सुरू आहे. अहवाल आल्यावर सत्यस्थिती बाहेर येईल, असंही ते म्हणाले.
संबंधित बातम्या:
VIDEO: अनिल देशमुख-सचिन वाझे भेटले, 10 मिनिटे बोलले; वसुली प्रकरणाला टर्न मिळणार?