पुणे | 5 सप्टेंबर 2023 : पुणे शहरात नेहमी वेगवेगळे प्रयोग केला जातात. ५ सप्टेंबर हा देशभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात असताना पुणे शहरात कार्यक्रम होत आहे. अधिकारी किती मोठा झाला तरी तो आपल्या शिक्षकांसंदर्भात नेहमी कृतज्ञ असतो. आपल्या गुरुजनांसंदर्भात आदर व्यक्त करण्यासाठी पिंपरी, चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंग यांनी मंगळवारी वेगळीच भूमिका घेतली. त्यांच्या या निर्णयाची चांगलीच चर्चा सुरु आहे आणि विद्यार्थीही खूश झाले आहेत.
शिक्षक दिनाचे निमित्त साधून पिंपरी, चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंग महानगरपालिकेच्या शाळेत पोहचले. मग त्यांनी या ठिकाणी शिक्षकांची भूमिका सुरु केली. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिकवणेही सुरु केले. त्याचवेळी शाळेतील करण काकडे आणि अपेक्षा माळी या दोन विद्यार्थ्यांना आयएएस अधिकारी होण्याची सुवर्ण संधी दिली. हे विद्यार्थी इंद्रायणी नगर आणि काळेवाडी शाळेतील होते.
करण काकडे आणि अपेक्षा माळी विद्यार्थी आयएएस अधिकाऱ्याच्या गाडीने पिंपरी, चिंचवड मनपात गेले. त्यावेळी सुरक्षा रक्षकाने त्यांना दमदार सॅल्यूट ठोकला आणि ते आयुक्तांच्या दालनात गेले. मग या आयएएस झालेल्या विद्यार्थ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या कार्यालयात करण आणि अपेक्षा गेले. त्या ठिकाणी त्यांनी आढावा घेतला. किती कर्मचारी काम करतात, ही माहिती घेतली.
आयुक्त विद्यार्थी झाले असताना आयुक्त असलेले शेखर सिंग शिक्षक झाले. आज मी शिक्षक झालो आणि तुम्ही अधिकारी झाले याबाबत विद्यार्थ्यांना त्यांनी विचारणा केली. या प्रसंगासंदर्भात बोलताना शेखर सिंग म्हणाले, शिक्षक होण्याचा अनुभव अविस्मरणीय होता. यावेळी मी विद्यार्थ्यांना भारताच्या चांद्रयान प्रकल्पाची माहिती दिली. त्यावेळी अनेक मुलींनी मला आपण शास्त्रज्ञ होणार असल्याचे सांगितले. तसेच शिक्षण प्रणालीत बदल करण्यासंदर्भात काही सूचनाही विद्यार्थ्यांनी केल्या. या अनुभवामुळे माझ्याही विद्यार्थी असतानाच्या आठवणी जागृत झाल्या.