पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील सोनवडी परिसरात भिमा नदीच्या पात्रात मासे व्यवसाय करणारा किरण नगरे याला तब्बल 20 किलोचा कटला जातीचा मासा सापडला.
या माशाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेत. त्यानंतर हा मासा पाहण्यासाठी अनेकांनी नदीकडे धाव घेतली. भिमा नदीच्या पात्रात अनेक वर्षांनंतर सर्वात जास्त किलो वजनाचा मोठा मासा सापडला आहे.
भिमा नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आल्यानंतर विविध जातीचे लहान मोठे मासे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. इंदापूर तालुक्यातही मागील काही महिन्यांपूर्वी भिमा नदीत मच्छिमारांच्या जाळात असे मोठे मासे सापडल्याची घटना होती.
त्यानंतर आज (30 जुलै) दौंड तालुक्यातील सोनवडी या ठिकाणी हा 20 किलो वजनाचा मासा सापडला. मागील काही दिवसात सोनवडी बंधाऱ्यावर मोठ्या प्रमाणात मासेमारी होत आहे. त्यामध्ये अनेक जातीचे मासे आढळून आले आहेत.
सध्या भिमा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर चिलापी जातीचेच मासे सापडतात. कटला, रहु, वाम्ब, मरळ या जातीच्या माशांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे या माशांना सध्या भाव अधिक आहे.