पुणे : कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान पार पडले होते. निकाल गुरुवारी २ मार्च रोजी येणार आहे. परंतु निकालापूर्वीच फ्लेक्सच्या माध्यमातून निकाल लावण्यात आला आहे. सोमवार व मंगळवारी कसबापेठेत निकालाआधीच विजयाचे बॅनर लावण्यात आले होते. कसबा पेठेत भाजपचे हेमंत रासने यांच्या विजयाचे बॅनर लावत शुभेच्छा कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या होत्या. आता फ्लेक्शचे हे लोण पिंपरी चिंचवडमध्ये पसरले आहे. पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर चिंचवड मतदारसंघाचा आमदार म्हणून अश्विनी लक्ष्मण जगताप यांचे फलक लागलेत.
काय लागले फ्लेक्स
कसब्यात मतदार संघात काही ठिकाणी फ्लेक्स लावले होते. त्यात हेमंत रासने यांचा विजयी मुद्रेतील फोटो होता. त्यावर यतो धर्म: ततो जय: असं लिहिलंय. त्यानंतर आमदार हेमंत (भाऊ) रासने यांचा कसबा पोटनिवडणुकीत प्रचंड बहुमताने विजय झाल्याबद्दल हार्दीक अभिनंदन, अशा शुभेच्छा देणारा मजकूर फ्लेक्सवर लिहिण्यात आला आहे. आता पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर चिंचवड मतदारसंघाचा आमदार म्हणून अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या विजयाचे फलक लागले आहेत. मंगळवारी मध्यरात्री द्रुतगती मार्गावरील उर्से टोलनाका येथे अश्विनी लक्ष्मण जगताप यांची आमदारपदी निवड झाली म्हणून फलक लावण्यात आलेत. पुण्यातील फलकाचे लोण द्रुतगती मार्गावर येऊन पोहचले आहे.
निकालापूर्वी झाले आमदार
निकाल आधीच आमदार अश्विनी जगताप म्हणत समर्थकांकडून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यापूर्वी सोमवारी पुण्यातील अनेक चौकात रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचे देखील बॅनर लावण्यात आले होते. पण आता हे विजयाचे बॅनर हटवण्यात आले. त्यानंतर हेमंत रासने यांच्या विजयाचे बॅनर लागले. आता पिंपरी चिंचवडमध्ये बॅनरबाजी करण्यात येत असल्याने शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये ३७ फेऱ्या
पिंपरी चिंचवडमध्ये एकूण २८ उमेदवार रिंगणात आहे. तरी प्रमुख लढत भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीतील नाना काटे व अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यांत लढत आहे. गुरुवारी होणाऱ्या मतमोजणीत ३७ फेऱ्यांमध्ये निकाल येणार आहे. त्यामुळे दुपारी १२ वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. मतमोजणीच्या दिवशी गावडे कामगार भवन परिसरात जमावबंदीचे आदेश दिले आहे.