पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (Pimpri Chinchwad RTO) केलेल्या तपासणीत पिंपरी चिंचवड शहरात 38 ड्रायव्हिंग स्कूल अनधिकृत असल्याचे समोर आले आहे. शहरात 188 वाहन प्रशिक्षण केंद्र असून त्यातील 38 केंद्रात त्रुटी आढळल्याचे परिवहन कार्यालयाच्या तपासणीत पुढे आले आहे. त्यामुळे वाहन शिकवणाऱ्या संस्था अधिकृत (Authorised) आहेत का, हे पाहून नागरिकांनी त्या ठिकाणी वाहन शिकायला जावे, असे आवाहन परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, अनधिकृत ड्रायव्हिंग स्कूलवर कारवाई केली जाईल, असे परिवहन कार्यालयाने स्पष्ट केले आहे. वाहन अपघातांचे (Accident) प्रमाण एकीकडे वाढले असताना अशाप्रकारे अनधिकृत, त्रुटी असलेल्या संस्थांमुळे समस्या अधिक गंभीर होत चालली आहे. आपला जीव आणि यासह इतरांचाही जीव सुरक्षित राहावा, म्हणून नागरिक चांगल्या वाहनचालक संस्थांच्या शोधात असतात, त्यात आता ही नवीच समस्या निर्माण झाली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये रस्ते अपघात आणि त्यामुळे होणारे मृत्यू अधिक आहेत. सर्वाधिक सुरक्षित वाहतूक कशी करायची, योग्य वाहनचालक रस्त्यावर उतरावा, यासाठी ड्रायव्हिंग स्कूल चालक आरटीओच्या माध्यमातून इच्छुक नागरिकांना प्रशिक्षण देत असतात. मात्र या संस्थाच अनधिकृत असल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडे वाहन शिकवण्याचा परवानादेखील नसल्याचे चित्र समोर आले आहे. या वाहनांची आरटीओ इन्स्पेक्टरने तपासणी केली असता, काही वाहने विनापरवाना धावत आहेत. शिवाय त्यात अनेक त्रुटीदेखील आहेत.
आरटीओच्या अनेक नियमांची पायमल्ली याठिकाणी होत आहे. यात वाहनांची नोंद नसणे, वाहनांची आरटीओच्या नियमानुसार तपासणी नसणे, अनेक वाहनांची झालेली दुरवस्था याचा समावेश आहे. याव्यतिरिक्त ड्रायव्हिंग स्कूलच्या पत्त्यामध्ये बदल नसणे, स्कूल फॉर्म 11चे प्रमाणपत्र संबंधित चालकांकडे नसल्याचे निदर्शनास आले आहे. 2 जूनरोजी अशांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यानंतर सात जूनपर्यंत मुदतही देण्यात आली होती. आता 12 जूननंतर यातील 18 वाहने कायमस्वरुपी बंद करण्यात आली आहेत. तर काहींनी आरटीओला संबंधित नोटिशीचे उत्तर दिल्याने काहींचे परवाने नूतनीकरणाच्या प्रक्रियेत आहेत.