पुणे : पुणे रेल्वे स्थानकातील (Pune Railway Station) प्लॅटफॉर्मच्या तिकीटदरात वाढ करण्यात आली आहे. तिप्पट वाढ करण्यात आल्यानं आता प्लॅटफॉर्म तिकीटासाठी पुण्यात रेल्वे स्थानकात जाण्यासाठी अतिरीक्त पैसे मोजावे लागणार आहेत. 10 रुपये असणाऱ्या प्लॅटफॉर्म तिकीटाची किंमत आता 30 रुपये इतकी झाली आहे. प्लॅटफॉर्मवरील अतिरीक्त गर्दी (Crowd) कमी करण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेतला गेल्याचं बोललं जातंय. तात्पुरत्या कालावधीसाठी हा निर्णय घेण्यात आलाय. 18 मे ते 31 मे या कालावधीत हा प्लॅटफॉर्म तिकीट (Platform Ticket News) दरवाढीचा हा निर्णय लागू असणार आहे. रेल्वे प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, ज्यांच्याकडे कन्फर्न तिकीट असणार आहे, त्यांनाच फक्त रेल्वे स्थानकात प्रवेश करता येईल. ज्यांच्या वेटीग लिस्ट तिकीट असेल, त्यांना रेल्वे स्थानकात प्रवेश करता येणार नाही किंवा प्रवासही करता येणार नाही. रेल्वे स्थानक परिसरात गर्दी होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबईतही प्लॅटफॉर्म तिकीटाच्या दरात वाढ करण्यात आली होती. 10 रुपयांवरुन प्लॅटफॉर्म तिकीट हे 50 रुपये करण्यात आलेलं. त्यानंतर आता पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ केली गेलीय.
मे महिन्याच्या सुट्टीदरम्यान, अनेकजण रेल्वे स्थानकात आपल्या नातलगांना, किंवा जवळच्या माणसांना सोडण्यासाठी रेल्वे स्थानकात येत असतात. त्यामुळे गर्दी होते. वाढती गर्दी पाहता, प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे लोकांनी रेल्वे स्थानक परिसरात येऊन गर्दी करु नये, असं आवाहन पुणे रेल्वे अधिकारी मनोज जव्हार यांनी केलं आहे.
13 मे रोजी पुण्यात पुणे रेल्वे स्थानक परिसरात खळबळजनक वस्तू आढळून आली होती. त्यानंतर पुणे रेल्वे स्थानकाता प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोन रिकामी करण्यात आलेला. प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर पोलिसांना एक संशयास्पद वस्तू आढळली होती. ही वस्तू नंतर बॉम्बशोधक पथकानं निकामीदेखील केली होती. या संशयास्पद वस्तूमुळे पुणे रेल्वे स्थानक परिसरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पाच दिवसांनी पुणे रेल्वे स्थानकाचं प्लॅटफॉर्म तिकीट वाढवण्यात आलंय.
दरम्यान, रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या अनावश्यक घटकांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरतेय. रेल्वे स्थानक परिसरात गर्दुले, भिकारी आणि इतकही अनेकजण अनावश्यक कारणं फिरत असतात, त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. मात्र जे नियम पाळतात, त्यांनाच या दरवाढीचा फटका बसणार आहे, असं प्रवाशांनी म्हटलंय. प्लॅटफॉर्म तिकीटाच्या वाढलेल्या दरांमुळे पुणे रेल्वे प्रवाशांमध्ये नाराजी आहे.