PM Modi : पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याकडे ग्रामस्थांची पाठ? वाहने रिकामीच पाठवली; कारण काय?

| Updated on: Oct 26, 2023 | 10:29 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नगरच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतील. त्यानंतर निळवंडे तालुक्यातील धरणाच्या पाण्याचे जलपूजन करतील. नंतर एका शेतकरी मेळाव्याला संबोधितक करणार आहेत.

PM Modi : पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याकडे ग्रामस्थांची पाठ? वाहने रिकामीच पाठवली; कारण काय?
shirdi
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

कुणाल जायकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नगर | 26 ऑक्टोबर 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डी दौऱ्यावर येत आहेत. यावेळी मोदी यांच्या हस्ते अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या पाण्याचे जलपूजन करण्यात येणार आहे. तसेच त्यानंतर मोदी एका शेतकरी मेळाव्याला ही संबोधित करणार आहेत. त्यानिमित्ताने भाजपकडून मोठी तयारी करण्यात आली आहे. या सभेला ग्रामस्थांना आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण नगरमधील एका गावातील नागरिकांनी सभेसाठी पाठवलेल्या बसेस रिकाम्याच पाठवल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक होत या ग्रामस्थांनी बसेस रिकाम्या पाठवल्याचं सांगितलं जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौऱ्यासाठी ग्रामस्थांना घेण्यासाठी आलेल्या बसेस परत पाठवण्यात आल्या आहेत. शेवगाव तालुक्यातील मठाचीवाडी येथील ग्रामस्थांनी ही वाहने परत पाठवली आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात मठाचीवाडी येथील सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. या गावात पुढाऱ्यांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच विखे कुटुंबीयांविरोधात मठाचीवाडी येथील सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्याचा फटका मोदी यांच्या सभेला बसताना दिसत आहे.

आता साईचं दर्शन लवकर

दरम्यान, साईबाबांच्या दर्शनासाठी तास न् तास दर्शन रांगेत उभे राहण्यापासून भाविकांची लवकरच सुटका होणार आहे. तिरूपतीच्या धर्तीवर 110 कोटी खर्च करून बांधण्यात आलेल्या साई मंदिराच्या अत्याधुनिक दर्शन रांगेच आज लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते या दर्शनरांगेच आज लोकार्पण होणार आहे.

मोदी तिसऱ्यांदा साईचरणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. मोदींच्या जिल्ह्याच्या दौऱ्याची सुरुवात साईबाबांच्या समाधीच्या दर्शनाने होणार आहे. मोदी तिसऱ्यांदा साईबाबांचं दर्शन घेणार आहेत. यापूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री असताना 2008 साली आणि देशाचे पंतप्रधान झाल्यावर 2018 साली नरेंद्र मोदी साईबाबांच्या दर्शनाला आले होते. त्यानंतर आज तिसऱ्यांदा ते साईबाबांच्या चरणी नतमस्तक होतील..

2018 मध्ये साईबाबांच्या समाधीचे शताब्दी वर्ष होतं. या सोहळ्याची सांगता नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झाली होती. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वातानुकुलित दर्शन रांग आणि शैक्षणिक संकुलाचे भूमिपूजन करण्यात आलं होतं. आज पाच वर्षांनी वातानुकूलित दर्शन रांगेच लोकार्पण करण्यासाठी नरेंद्र मोदी शिर्डीत येत आहेत.

आज दुपारी 1च्या सुमारास मोदी साई मंदिरात पोहोचतील. साई मंदिरात पोहोचल्यानंतर त्यांच्या हस्ते पाद्य पूजा होईल. त्याचबरोबर शिर्डी माझे पंढरपुर ही छोटेखानी आरती सुद्धा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यानंतर साईबाबा संस्थानच्या 2024 च्या डायरीचा प्रकाशन पंतप्रधानांच्या हस्ते होईल. या ठिकाणाहून दर्शन घेतल्यानंतर ते अकोले तालुक्यातील निळवंडेकडे रवाना होतील.