अभिजीत पोटे, पुणे : शहरातील जवळपास 25 मार्ग बंद करण्याचा निर्णय पीएमपीएमएल (PMPML) प्रशासनाने घेतला आहे. तर नव्याने चार मार्ग सुरू करण्याचा निर्णय देखील प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. शहरातील एकूण 25 मार्गांवर प्रवाशांचा प्रतिसाद खूप अल्प प्रमाणात मिळत आहे. त्यामुळे आधीच तोट्यात असलेल्या पीएमपी प्रशासनाला मोठे नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे हे मार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 2 ऑगस्ट रोजी तोट्यातील हे मार्ग (Unprofitable routes) बंद करण्यात येणार आहेत. तर शहरातील काही मार्गांवरचा प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेता 20 मार्गांवर बसच्या फेऱ्या अधिक वाढवण्याचा निर्णयदेखील पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. तर चार नवे मार्गही सुरू करण्यात येणार आहे. येत्या तीन दिवसात याचीदेखील अंमलबजावणी (Implementation) होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
पीएमपी तोट्यात आहे. त्यामुळे ज्या मार्गांवर प्रवाशांचा प्रतिसाद अल्प आहे, अशा ठिकाणची सेवा थांबवत आहोत. तर ज्याठिकाणी प्रवाशांचा अधिक प्रतिसाद आहे, अशा नव्या मार्गांवर सेवा सुरू करत आहोत, असे पीएमपी प्रशासनाने सांगितले आहे. मागे एसटी संपावेळी ग्रामीण भागातील तोट्यातील मार्ग पीएमपीने बंद केले होते. दरम्यान, प्रवासी संख्या वाढण्याच्या दृष्टीने पीएमपी योजनाही राबवत असते. यंदा वर्धापनदिनी पीएमपीने वर्षभर मोफत प्रवासाची योजना आणली. त्यासाठी लकी ड्रॉदेखील काढण्यात आला होता. बसची संख्याही वाढवण्यात आली आहे. सीएनजीसोबतच इलेक्ट्रिक बसेसदेखील पीएमपीच्या ताफ्यात आहेत.