पुणे | 16 सप्टेंबर 2023 : गणेश उत्सवाची जोरदार तयारी पुणे शहरात सुरु आहे. गणेश मंडळांचे आरास तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ही आरास पाहण्यासाठी रात्रभर गर्दी होते. त्यामुळे गणेश उत्सवासाठी पीएमपीएल जादा बसेस सोडणार आहे. एकूण 270 जादा बसेस सोडण्यात येणार आहे. 19 ते 28 सप्टेंबर दरम्यान शहरात जादा बसेस धावणार आहेत. तसेच गणेशोत्सव दरम्यान पीएमपीएमएलच्या बसेस रात्रभर सेवा देणार आहे. यामुळे भाविकांची सुविधा होणार आहे.
पुणे शहरात गणेशोत्सवासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. पुणे शहरात 7000 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. गणेशोत्सवात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी बंदोबस्तात वाढ करण्यात येणार आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील 5000 पोलीस कर्मचारी आहेत. तसेच गुन्हे शाखेचे पथक आहे. बाहेर गावावरून 1300 पोलीस कर्मचारीसुद्धा शहरात तैनात असणार आहे. गणेशोत्सव दरम्यान दिवसभरातून चार वेळा बॉम्ब शोधक आणि नाशक पथक तपासणी करणार आहे.
पुणे रेल्वे विभागाने दमदार कामगिरी केली आहे. पुणे विभागातून रेल्वेला 44 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. पुणे विभागातून ऑगस्टमध्ये 167 मालगाड्या धावल्या होत्या. पुणे विभागात प्रवाशी वाहतुकीबरोबर मालवाहतुकीला प्रतिसाद वाढत आहे. अनेक उद्योजक रस्ते वाहतुकीपेक्षा मालवाहुकीला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे पुणे विभागाची मालवाहतूक वाढली आहे.
नगर रस्त्यावर अभ्यासासाठी गोखले इन्स्टिट्यूटची नियुक्ती करण्यात आली आहे. नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीस बीआरटीचा मार्ग जबाबदार असल्याचा आरोप लोकप्रतिनिधींकडून होत आहे. त्याचा अभ्यास करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी आता गोखले इन्स्टिट्यूटची नियुक्ती केली आहे. त्याचा सविस्तर अहवाल तयार करण्याची जबाबदारी या संस्थेला दिली असल्याची माहिती आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. महापालिकेपासून ते खराडी जकात नाक्यापर्यंत बीआरटी मार्गाची अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिष्ठापना सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते केली जाणार आहे. 19 सप्टेंबर रोजी दहा वाजून 23 मिनिटांनी दगडूशेठ गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यापूर्वी सकाळी साडेआठ वाजता श्रींच्या आगमन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. दगडूशेठ मंडळाने यंदा आयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या प्रतिकृती बनवली आहे.