हिदू धर्माच्या भावना दुखवल्याची तक्रार, जितेंद्र आव्हाडांविरोधात पुण्यात पहिला गुन्हा दाखल

| Updated on: Jan 05, 2024 | 4:35 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झालाय. भाजपकडून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आंदोलन केली जात आहे. याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पुण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिदू धर्माच्या भावना दुखवल्याची तक्रार, जितेंद्र आव्हाडांविरोधात पुण्यात पहिला गुन्हा दाखल
Follow us on

पुणे | 5 जानेवारी 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी त्यांच्याविरोधात पुण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या प्रकरणी आव्हाड यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे शहर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी स्वतः जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध तक्रार दिली होती. जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आव्हाड यांच्यावर कलम 295 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. विशेष म्हणजे भाजपकडून नुकतंच आव्हाडांच्या वक्तव्याविरोधात आंदोलन करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्याविरोधात आज गुन्हा दाखल करण्यात आलाय.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचं शिर्डीत चिंतन शिबिर आयोजित करण्यात आलेलं. या शिबिरमध्ये भाषण करताना जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. राम हे शाकाहारी नव्हते तर मांसाहारी होते, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झालाय. भाजप नेत्यांकडून जितेंद्र आव्हाड यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडूनही आव्हाडांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. आव्हाडांवर देशभरातून टीकेची झोड उठत आहे. आव्हाडांनी स्वत: आपल्या वक्तव्यावर खेद व्यक्त केलं होतं. त्यानंतर आता त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याविरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज देखील पाहायला मिळत आहेत. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर राम भक्तांनी आव्हाडांच्या वक्तव्याचा निषेध करत आव्हाडांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदवला आहे. यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली.

जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ते वादात सापडले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी त्यांना घरचा आहेर दिलाय. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शाकाहारी आणि मांसाहारी असा भेद करण्याची गरज नाही, असं म्हटलं. तर आमदार रोहित पवार यांनीदेखील जितेंद्र आव्हाड यांच्या विधानावरुन त्यांना ट्विटरवर खडेबोल सुनावले.