योगेश बोरसे, पुणे | 24 जुलै 2023 : पुणे शहरात सोमवारी पहाटे दुर्देवी घटना घडली. बड्या पोलीस अधिकाऱ्यांने आपल्या कुटुंबातील दोघांना संपवले. त्यानंतर स्वत:चा शेवट केला. एका सुखी कुटुंबाचा काही क्षणात शेवट झाला. या प्रकारामुळे पोलीस दलात खळबळ निर्माण झाली आहे. त्या पोलीस अधिकाऱ्याने हे कृत्य का केला? या प्रश्नाचे उत्तर पोलिसांना चौकशीनंतर मिळणार आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहे. पुण्यातील बाणेर परिसरात ही घटना घडली.
अमरावती पोलीस दलातील भारत गायकवाड सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे कुटुंब पुणे शहरात वास्तव्यास आहे. सोमावारी पहाटे चार वाजता त्यांनी पत्नीचा खून केला. त्यानंतर पुतण्यावर गोळी झाडली. या दोघांच्या खुनानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. मोनी गायकवाड (वय 44) ही भारत गायकवाड यांची पत्नी आहे तर दीपक गायकवाड (वय 35) हा त्यांचा पुतण्या आहे. घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.
भारत गायकवाड हे अमरावती पोलीस दलात सहायक आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांचे कुटुंबीय गेल्या काही वर्षांपासून पुण्यात वास्तव्याला होते. नेमकी ही हत्या करण्याचे आणि त्यानंतर आत्महत्या का केली? घटनास्थळी त्यांनी काही चिठ्ठी लिहिली आहे का? या प्रश्नांची उत्तरे पोलिसांच्या तपासानंतर मिळणार आहे.
पोलीस दलातील अधिकाऱ्याने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलीस दलात असणारा तणतणाव की कौटुंबिक कलह? असे कोणते कारण या घटनेमागे आहे, याचा शोध पोलिसांना घ्यावे लागणार आहे. तसेच पोलीस कर्मचाऱ्यांसाठी प्रबोधनात्मक शिबिरे घेणेही गरजेचे झाले आहे.