छगन भुजबळ यांचं प्रकाश आंबेडकर यांना मोठं आवाहन, आंबेडकर सोबत येणार?; काय म्हणाले भुजबळ?

| Updated on: Dec 09, 2023 | 6:17 PM

महाराष्ट्रात विचार करणारा मराठा समाज आहे. हा समाज का गप्प आहे? परिस्थिती का मांडत नाही? तुम्ही बोलायला तयार नाही. कसली भीती वाटते? निवडणुकीच्या मतांची? आमच्याकडे मते नाही? त्यांच्याकडे 20 टक्के आहेत. तर आमच्याकडे 80 टक्के मते आहेत, असं छगन भुजबळ म्हणाले. आमचं 27 टक्के आरक्षण भरा. मग बाकीच्या गोष्टी करा. लोकसेवा आयोगाच्या 650 नियुक्त्या झाल्या. त्यात 85 टक्के मराठा समाज आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

छगन भुजबळ यांचं प्रकाश आंबेडकर यांना मोठं आवाहन, आंबेडकर सोबत येणार?; काय म्हणाले भुजबळ?
prakash ambedkar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

इंदापूर | 9 डिसेंबर 2023 : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणा वाचवण्यासाठी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांना पुढाकार घेण्याचं आवाहन केलं आहे. मंडल आयोगाची लढाई तुम्ही लढला. आमच्यासाठी मैदानात उतरून आम्हाला आरक्षण मिळवून दिलं. आता ओबीसींचं आरक्षण धोक्यात आलं आहे. तुम्ही आमचं आरक्षण वाचवण्यासाठी पुढं आलं पाहिजे, अशी सादच छगन भुजबळ यांनी प्रकाश आंबेडकर यांना घातली आहे. इंदापूर येथील ओबीसी एल्गार परिषदेतून भुजबळ यांनी ही साद घातली आहे.

राजकारण्यांना सांगतो तुमचा राग भुजबळांवर असू शकतो. पण ओबीसींवर असता कामा नये. आज प्रश्न ओबीसींचा आहे. माझ्या राजकारणावर राग काढा. पण ओबीसींवर काढू नका. सर्व नेत्यांनी ओबीसींचं आरक्षण वाचवण्यासाठी पुढे आलं पाहिजे. तुम्ही म्हणताना आम्ही ओबीसींचं आरक्षणासाठी लढलो. मंडलची लढाई लढली. मग हे आरक्षण वाचवण्यासाठी तुम्हालाच यायला पाहिजे. तुम्ही लढाई लढलात हे खरं आहे. जनार्दन पाटील, दिबा पाटील, प्रकाश आंबेडकर आरक्षणाच्या लढाईत पुढे होते. आताही आरक्षण वाचवण्यासाठी तुम्ही आलं पाहिजे. ही विनंती आहे. राग काढण्याची ही वेळ नाही, असं छगन भुजबळ म्हणाले.

घाबरला तर मातीमोल व्हाल

तुम्ही घाबरला तर मातीमोल व्हाल. तुम्ही भीतीला मारलं तर एका उंचीवर समाजाला न्याल. म्हणून हिंमतींने काम करावं लागेल. सर्वांना बरोबरींना घेऊन जावं लागेल, असं सांगतानाच प्रकाश आंबेडकरांचेही आम्ही आभार मानतो. त्यांनी सांगितलं ओबीसी आणि मराठ्याचं ताट वेगळं पाहिजे. ते असतील, शरद पवार असतील, राजकारणातील इतर पुढारी असतील सर्वांनीच पुढे यायला पाहिजे, असं आवाहनही भुजबळ यांनी केलं.

बोला कुणबी सर्टिफिकेट हवंय का?

मला विचारायचं आहे. हर्षवर्धन पाटील कुणबी सर्टिफिकेट पाहिजे का? विजयसिंह मोहिते पाटील कुणबी सर्टिफिकेट घेणार का बोला? काकडे कुणबी सर्टिफिकेट घेणार का? तुम्हाला नकोय तर नको सांगा, गप्प का बसला? तो म्हणतोय सर्व मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट द्या. म्हणजे महाराष्ट्रात एकही मराठा राहणार नाही. सर्व कुणबी. सर्व शांत बसले. कशासाठी? निवडणुकीसाठी?, असा सवाल भुजबळ यांनी केला.

अरे सरपंच होऊन दाखव

मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांचा उल्लेख येवल्याचं येडपट असा केला होता. त्याचाही भुजबळ यांनी समाचार घेतला. 1985 ला त्याचा जन्म झाला की नाही माहीत नाही. मी त्यावेळी मुंबईचा आमदार आणि महापौर झालो. एकदा नाही, दोनदा झालो. भारतातील महापौरांचा अध्यक्ष झालो. अरे तू ग्रामपंचायतीचा सरपंच होऊन दाखव. डोक्यात हवा गेली. लोकांनी उगीच काही तरी करून ठेवलंय, असं भुजबळ म्हणाले.

यावेळी त्यांनी एक किस्सा ऐकवला. जरांगे पाटील यांचं नेमकं काय झालं? हेच त्यांनी या किश्श्यातून स्पष्ट केलं. गावात पाण्याची टाकी असते. एके दिवशी सर्व लोक उठले. पोरं उठले. त्यांची जोरात चर्चा सुरू होती. एक वयस्क बाबा आले. म्हणाले, काय रे पोरांनो का जमलाय? पोरं म्हणाले, काका टाकीवर गाढव चढलंय. त्याला खाली कसं काढायचं याची चर्चा सुरू आहे.

काका म्हणाले, त्याला खाली कसं घ्यायचं ते आम्ही पाहू. पण त्याला एवढ्या उंचीवर घेऊन गेले कोण?… जरांगे यांची अवस्था अशीच झाली आहे. आधी त्यांना डोक्यावर बसवलं आणि आता सगळे ते डोक्याला हात लावून बसले. काय करायचं याचं? याला कसं खाली करायचं? असा सवाल सर्वांना पडला आहे. याला नेलं तुम्ही तेव्हा काही बोलला नाही. आता डोक्याला हात लावून बसले, असा हल्लाच त्यांनी चढवला.