पुणे | 14 सप्टेंबर 2023 : कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणाची चौकशी आयोगाकडून सुरू आहे. या चौकशीत पुणे येथील तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. सौरभ राव यांचीही उलट तपासणी घेण्यात आली आहे. आता शनिवारी वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांची उलटतपासणी होणार आहे. तसेच या प्रकरणी इतर काही जणांचीही उलटतपासणी होऊ शकते. कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी हिंसाचार झाला होता. या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी माजी न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमण्यात आला आहे. या आयोगात निवृत्त मुख्य सचिव सुमित मलिक सदस्य आहेत.
पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाला गेल्या तीन महिन्यांपासून शिक्षण प्रमुख नाही. यामुळे मनपाच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण होत आहे. महापालिकेच्या शहरात 260 शाळा आहेत. त्यामध्ये जवळपास 90 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून शिक्षण प्रमुख नसल्याने मुलांचे डीबीटीचे पैसे, शिक्षकांचे वेतन, शाळांची दुरुस्ती असे प्रस्ताव रखडले आहे.
राजगुरुनगर नगरपरिषदेच्या दोन अधिकाऱ्यांना आठ हजार रूपयांची लाच घेतांना दोन अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या अभियंत्या चारुशीला हरडे आणि लेखापाल प्रवीण कापसे यांना लाच घेताना पकडले आहे. ठेकेदाराचे बिल काढण्यासाठी आठ हजारांची लाच त्यांनी मागितली होती.
पुण्यातील सेंट्रल बिल्डींग सौर ऊर्जेचे पॅनल बसवण्यात येणार आहे. यामुळे विजेबाबत सेंट्रल बिल्डींग स्वयंपूर्ण होणार आहे. या ठिकाणी 80 किलोवॅट क्षमता असणारे सौर ऊर्जेचे पॅनल बसवले जाणार आहे. त्या ठिकाणावरुन राज्य सरकारच्या 32 विभागांना वीज पुरवठा होणार आहे. या ऊर्जा प्रकल्पासाठी 42 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
पुणे मनपाने अधिकाऱ्यांवर धडक कारवाई केली आहे. अनधिकृत होर्डिंग्जकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी तीन क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांच्या पाहणीत तीन अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावले नाही. यामुळे त्यांची विभागीय चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुण्यातील मंडई परिसरात मराठा समाजाच्या वतीने मराठा क्रांती मोर्चातर्फे उपोषण करण्यात येणार आहे. मराठा आरक्षण, सराटी गावात झालेला लाठीचार्ज आणि मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात पुण्यात मराठा क्रांती मोर्चाकडून उपोषण करण्यात येणार आहे.