पुणे : माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचं निधन झालं आहे. वयाच्या 89व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पत्नी प्रतिभा पाटील आणि एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. देविसिंह शेखावत यांच्या निधनावर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहेत.
माजी आमदार देविसिंह शेखावत यांचं आज सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी दु:खद निधन झालं. देविसिंह शेखावत यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्यांना दोन दिवसांपूर्वीच येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र वयोमानामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली होती. ते उपचाराला प्रतिसाद देत नव्हते. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. आज संध्याकाली 6 वाजता पुण्यातच त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
देविसिंह रणसिंह शेखावत हे माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पती आहेत. ते स्वत: राजकारणात सक्रिय होते. त्यांनी आमदार म्हणूनही काम पाहिलं आहे. देवीसिंह शेखावत यांचा 7 जुलै 1965 रोजी प्रतिभा पाटील यांच्यासोबत विवाह झाला होता. विवाहाच्यावेळी देवीसिंह शेखावत हे अमरावतीचे महापौर होते. अमरावतीतील सामाजिक कार्यात ते सक्रिय होते.
सुरुवातीच्या काळात देवीसिंह शेखावत यांनी रसायन शास्त्राचे प्राध्यापाक म्हणून काम पाहिलं होतं. 1972मध्ये मुंबई विद्यापीठाने त्यांना पीएचडी दिली होती. विद्या भारती शिक्षण संस्था या त्यांच्या संस्थेचे ही ते काम पाहत होते. त्यांच्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधून झाली. अमरावतीचे महापौर ते आमदार आदी पदे त्यांनी भूषविली आहेत. मात्र, 1995च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मोठा पराभव पत्करावा लागला होता. या निवडणुकीत त्यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं.