अमोल कोल्हेविरुद्ध शिरुरमधून अजितदादांकडून हा तगडा उमेदवार

| Updated on: Dec 25, 2023 | 12:46 PM

ajit pawar, amol kolhe shirur lok shaba | लोकसभा निवडणुकीची तयारी सर्व राजकीय पक्षांनी सुरु केली आहे. त्यावेळी अजित पवार यांनी सोमवारी केलेल्या वक्तव्यानंतर पुण्यात राजकीय चर्चा जोरात सुरु झाली. शिरुर मतदार संघातून अजित पवार उमेदवार देणार आहे.

अमोल कोल्हेविरुद्ध शिरुरमधून अजितदादांकडून हा तगडा उमेदवार
amol kolhe vilas lande
Image Credit source: tv9 Marathi
Follow us on

रणजित जाधव, पुणे, दि.25 डिसेंबर | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाविरुद्ध निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली आहे. अजित पवार यांचे लक्ष पुणे जिल्ह्यात जास्त आहे. पुणे येथील कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांना पराभूत करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. शिरुर येथील उमेदवार पाडणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले. पाच वर्षात एका खासदाराने शिरुर मतदार संघाकडे लक्ष दिले नाही. त्यांच्यामुळे हा मतदारसंघ दुर्लक्षित राहिला होता. या ठिकाणावरुन त्यांना निवडून आणण्यासाठी मी स्वतः जीवाचे रान केले होते. आता तेथे आपला असलेला उमेदवार निवडूनच आणणार, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. त्यानंतर अजित पवार गटाकडून शिरुरमधून कोण लढणार? या प्रश्नाची चर्चा सुरु झाली आणि तगड्या उमेदवाराचे नाव समोर आले.

कोण असणार उमेदवार ?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांच्या तक्रारीचा पाढा वाचला. अमोल कोल्हे निष्क्रिय खासदार आहे. शिरूर लोकसभेसाठी आता त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार देणार असल्याचे अजित पवार यांनी सोमवारी म्हटले. हा उमेदवार मी जिंकून आणणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर आता भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी आपली इच्छी जाहीरपणे व्यक्त केली. अजितदादांनी संधी दिली तर खासदारकी लढणार असल्याचे “टीव्ही 9 मराठी”शी बोलताना विलास लांडे यांनी म्हटले. मागील वेळेस आपली तयारी होती. त्यावेळी अमोल कोल्हे यांना संधी दिली गेली. मी अजित पवार यांचे नेतृत्व मान्य करुन थांबलो. परंतु आता आपली शंभर टक्के तयारी आहे.

हे सुद्धा वाचा

त्या वेळी संधी गेली, आता…

शिरुर लोकसभा मतदार संघाची मतदारांची संख्या 23 लाखांची आहे. या मतदार संघासाठी विलास लांडे 2019 मध्ये इच्छूक होते. त्यावेळी अमोल कोल्हेंमुळे त्यांची संधी गेली. आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर अजित पवार गटाकडून त्यांनी तयारी चालवली आहे. त्यांच्या वाढदिवसांनिमित्त मतदार संघात फ्लेक्स लावले होते. त्यात त्यांचा भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला होता. अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यासंदर्भात वक्तव्य केल्यानंतर लांडे यांना बळ मिळाले आहे.