पुणे | 19 ऑक्टोंबर 2023 : पुणे येथील ससून रुग्णालयात सुरु असलेले ड्रग्स तस्करी प्रकरण सध्या राज्यात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकरणातील आरोपी ललित पाटील फरार झाल्यानंतर त्याला तब्बल पंधरा दिवसांनी अटक करण्यात यश आले. मुंबई पोलिसांनी त्याला कर्नाटकमधून अटक केली. पुणे, मुंबई, नाशिक पोलिसांची पथके देशभरात त्याच्या शोधासाठी पसरली होती. अखेर तो पोलिसांना सापडला. त्याला अटक केल्यानंतर त्याने खबळजनक दावा केला. आपण पळालो नव्हतो, तर आपणास पळवले गेले होते, असे त्यांने म्हटले आहे.
ललित पाटील यांनी आपली नार्को टेस्ट करा, अशी मागणी स्वत: केली आहे. पुणे पोलिसांकडूनच आपल्या जीवाला धोका आहे. आपण पळालो नव्हतो तर आपणास पळवण्यात आले होते, यामागे कोणाचा हात आहे, यासर्वांची नावे आपण सांगणार आहोत, असा दावा ललित पाटील याने केल्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलीस आपली नार्को टेस्ट करु शकतात, असे त्याने म्हटले आहे.
ललित पाटील याच्या खळबळजनक खुलासानंतर अनेक जण रडारवर आले आहेत. त्यात राजकीय नेते, पोलीस अधिकारी ससून रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टरचाही समावेश आहे. ललित पाटील फरार झाल्यानंतर त्यांची व्यवस्था करणारेही संशयाच्या भवऱ्यात आले आहे. दरम्यान, गुरुवारी या प्रकरणी दोन महिलांना तब्यात घेण्यात आले.
ससून रुग्णालयातील कैदी ललिल पाटील फरार झाला होता. त्यानंतर आता ससून रुग्णालयातील प्रशासन अलर्ट झाले आहे. ससून रुग्णालय प्रशासनाकडून कैद्यांच्या वॉर्डसाठी नवीन जागेचा शोध सुरू केला आहे. कैद्यांचे वार्ड दुसऱ्या जागेवर स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. कैद्यांचे वॉर्ड हलवण्यासाठी पोलीस आणि कारागृह प्रशासनाकडून देखील मंजुरी लागणार आहे.
मुंबई पोलीस पुणे पोलिसांकडे ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील याचा ताबा मागणार आहे. भूषण पाटील याची पोलीस कस्टडी संपल्यानंतर मुंबई पोलीस न्यायालयात भूषण पाटलाचा ताबा मागण्याची शक्यता आहे. त्याची 20 ऑक्टोबर रोजी पोलीस कोठडी संपणार आहे.