पुणे: राज्यातील 12 हजार 711 ग्रामपंचायतीचा सोमवारी (18 जानेवारी) निकाल लागणार आहे. या निकालानंतर गुलाल उधळत विजयी मिरवणुका काढणार असाल तर सबूर… निकालानंतर गुलाल उधळणं… मिरवणुका काढणं… फटाके फोडणं…. अन् विजयी उमदेवारांचे अभिनंदन करणारे फ्लेक्स लावणेही तुम्हाला महागात पडू शकते. ग्रामपंचायत निकालाच्या पार्श्वभूमीवर हे सर्व प्रकार करण्यास मज्जाव करण्यात आला असून हा प्रकार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. राज्यातील सर्वच जिल्ह्यात या प्रकारांना बंदी घालण्यात आली आहे. (prohibition on gram panchayat election victory celebration)
राज्यातील 12 हजार 711 हजार ग्रामपंचायतींचा निकाल उद्या सोमवारी लागणार आहे. राज्यात कोरोनाचं संकट कायम असल्याने निवडणूक निकालानंतर मिरवणुका निघू नये म्हणून हे आदेश जारी करण्यात आले आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी एक आदेश जारीही केला आहे. या आदेशानुसार सोमवारी पहाटे 12 पासून ते रात्री 12 पर्यंत दिवसभर मिरवणुका काढणे, रॅली काढणे, फटाके फोडणे, गुलाल उधळणे या सर्व गोष्टींना बंदी घालण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच सोमवारी रात्री 10 पासून ते मंगळवारी 6 पर्यंत हॉटेल, ढाबे, खानावळी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही देशमुख यांनी दिला आहे. औरंगाबादसह काही जिल्हाधिकाऱ्यांनी बंदीचे हे आदेशच जारी केले आहेत. त्याशिवाय निवडणुकीचं कुणीही सेलिब्रेशन करू नये म्हणून हॉटेल, ढाबे आणि खानावळी उद्या रात्री 10 वाजल्यापासून ते मंगळवारी पहाटे 6 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.
दारुची दुकाने बंद
सोलापूरमध्येही विजयी उमेदवारांना जल्लोष करण्यास मनाई करण्यात आली आहे. ढोल, ताशा, वाजंत्री, फाटकेव वाजवून जल्लोष करण्यास तसेच गुलाल उधळून मिरवणुका काढण्यासही मनाई करण्यात आली आहे. सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेशच काढले आहेत. या शिवाय सोलापुरात दारूची दुकानेही बंद ठेवण्यात येणार आहेत. शिवाय विजयी उमेदवारांना तात्काळ नोटीसा बजावण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
नाशिकमध्ये जमावबंदीचे आदेश
नाशिक जिल्ह्यातही विजयानंतर मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेशही जारी करण्यात आले आहेत. कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन होऊ नये म्हणून ही कारवाई करण्यात येत आहे. या शिवाय जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन सज्ज झालं असून संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात येणार आहेत.
ढाबे, हॉटेल, फ्लेक्सलाही मनाई
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या सोमावारी रात्री 10 ते मंगळवारी पहाटे 6 वाजेपर्यंत ग्रामपंचायत निवडणुका असणाऱ्या भागातील हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे आणि खानावळी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर विजयी उमेदवारांच्या अभिनंदनाची फ्लेक्स लावण्यातही बंदी घालण्यात आली आहे.
कोल्हापुरात 31 जानेवारीपर्यंत जमावबंदी
कोल्हापूर जिल्ह्यात तर कोरोनामुळे 31 जानेवारीपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. उद्या मतमोजणीच्या दिवशी मिरवणूक काढण्यास आणि ध्वनीक्षेपक लावण्यासही मनाई करण्यात आली आहे. कोल्हापुरात आधीच हे आदेश लागू असल्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगळे आदेश काढण्यात आलेले नाहीत.
वसईत कलम 144 लागू
वसईतही निवडणूक विजयाचा जल्लोष करण्यास मनाई करण्यात आली आहे. वसईत 144 कलम लागू करण्यात आली आहे. जमावबंदी आदेश जारी करण्यात आल्याने वसईत मिरवणूक काढणे, गुलाल उधळने, फटाक्यांची आतिषबाजी करता येणार नाही. अन्यथा आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. वसई तालुक्यातील पाली आणि सत्पाला या दोन ग्रामपंचायतचा उद्या निकाल लागणार आहे. त्यासाठी सकाळी 10 वाजता वसई तहसील कार्यालयातील सभागृहात मतमोजणी सुरू होणार असल्याचं वसईच्या तहसीलदार उज्वला भगत यांनी सांगितलं. (prohibition on gram panchayat election victory celebration)
ग्रामपंचायतींवर एक नजर
>> निवडणूक जाहीर ग्रामपंचायती- 14,234
>> आज प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायती- 12,711
>> एकूण प्रभाग- 46,921
>> एकूण जागा- 1,25,709
>> प्राप्त उमेदवारी अर्ज- 3,56,221
>> अवैध नामनिर्देशनपत्र- 6,024
>> वैध नामनिर्देशनपत्र- 3,50,197
>> मागे घेतलेली नामनिर्देशनपत्र- 97,719
>> बिनविरोध विजयी होणारे उमेदवार- 26,718
>> अंतिम निवडणूक रिंगणातील उमेदवार- 2,14,880 (prohibition on gram panchayat election victory celebration)
LIVE : महत्त्वाच्या घडामोडी https://t.co/MqoPOmeTAQ
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 17, 2021
संबंधित बातम्या:
‘ग्रामपंचायती’च्या निकालानंतर विजयी मिरवणुका काढण्यास बंदी, पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे फर्मान
(prohibition on gram panchayat election victory celebration)