योगेश बोरेस, पुणे | 9 डिसेंबर 2023 : राज्यभर गाजलेल्या टीईटी घोटाळ्यातील मुख्य आरोपी राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त आणि शिक्षणाधिकारी तुकाराम सुपे यांच्याकडे आणखी कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडली आहे. अपसंपदा बाळगल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्यावर नुकताच गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी त्यांच्याकडे तीन कोटी 59 लाख 99 हजार रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघड झाली होती. त्यात आणखी भर पडली आहे. आता पुन्हा तीन कोटी 95 लाख 35 हजार 795 रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली. एकूण मालमत्ता साडेसात कोटींपर्यंत गेली आहे. तसेच रिव्हॉल्व्हर आणि काडतुसे मिळाली आहेत.
पुणे सायबर पोलिसांनी टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता घोटाळा उघड आणला होता. त्यानंतर सुपे यांना २०२१ मध्ये अटक करण्यात आली होती. टीईटी परीक्षेत पैसे घेऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यानंतर एसीबीकडून त्यांची चौकशी सुरु आहे. सुपे यांच्या घरी आणि इतर ठिकाणी टाकलेल्या छाप्यात ३ कोटी ५९ लाख रुपयांची अपसंपदा मिळाली. यानंतर एसीबीने त्यांच्यावर बेहिशेबी मलमत्तेप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल केला. त्यानंतर सुपे यांच्या पिंपळे गुरव येथील घराची तपासणी केली. त्यात तीन कोटी ९५ लाख रुपयांची मालमत्ता मिळाली. ही मालमत्ता पत्नी, मुलगा, मुलगी यांच्या नावावर होती. बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी सुपे यांच्याविरुद्ध एसीबीने सांगवी पोलिस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल केला आहे.
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात राज्यातील इतर अधिकारी रडारवर आहेत. त्यात सांगली येथील जि.प.चे वेतन अधीक्षक विजयकुमार सोनवणे, महाबळेश्वरचे गटशिक्षणाधिकारी वंदना वळवी, कोल्हापूर शाहूवाडी येथील गटशिक्षणाधिकारी प्रतिभा सुर्वे, सातारा जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकारी विलास भागवत, पुणे शालेय पोषण आहार शिक्षण मंडळाचे अधीक्षक व्ही. डी. ढेपे, पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील अधीक्षक शिल्पा मेनन, पुणे हवेली येथील गटशिक्षणाधिकारी आर एस वालझडे, विभागीय उपसंचालक प्रवीण अहिरे यांचा समावेश आहे.