पुणे | 22 सप्टेंबर 2023 : सध्या अनेक युवती आणि महिलांना अभिनेत्री होण्याची क्रेझ आहे. आपण मोठ्या नाही तर छोट्या पडद्यावर झळकावे, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु असतात. काही जण अभिनेत्री होण्यासाठी थेट मायानगरी मुंबईत पोहचतात. परंतु घरी बसल्या अभिनेत्री होण्याची संधी मिळाल्यास कोणाला नको असणार? पुणे शहरातील एका महिलेस अशीच अभिनेत्री होण्याची ऑफर आली. त्या महिलेने त्यासाठी तयारी दर्शवली आणि पुढील प्रक्रिया सुरु झाली. त्या महिलेस हैदराबादला शुटिंगसाठी बोलवले.
पुणे शहरातील एका ४८ वर्षीय महिलेस व्हॉट्सॲपवर अभिनेत्री होण्यासंदर्भातील मेसेज आला. एका वेबसीरिजमध्ये अभिनेत्रीची संधी मिळणार असल्याचे सांगितले. त्या महिलेने होकार दिला. त्यानंतर तिला व्हॉट्सॲपवर ‘Strictly Auditions Only’ या ग्रुपमध्ये ॲड करण्यात आले. बारीश या बेबसीरिजचे शुटींग हैदराबादला होणार आहे. त्यासाठी ऑडिशन टेस्ट आणि करार करण्यासाठी हैदराबादलाच जावे लागणार असल्याचे सांगितले.
महिलेला कालांतराने डायरेक्टर म्हणणाऱ्या एका व्यक्तीचा फोन आला. त्याने 42 दिवस शुटिंग असणार असल्याचे सांगितले. तसेच महिलेचे फोटो आणि व्हिडिओ क्लिप त्याने मागितली. 11 सप्टेंबर रोजी त्या महिलेला तिच्या भूमिकेसंदर्भात विस्तृत माहिती देण्यात आली. तिला शूटिंगे शेड्यूल दिले गेले. त्यानंतर 15 सप्टेंबर रोजी तिला प्रोड्यूसर म्हणणाऱ्या व्यक्तीचा फोन आला. त्याने हैदराबादला करार करण्यासंदर्भात जाण्याची विचारणा केली.
महिलेला हैदराबादला जाण्यासाठी इंडिगो विमानाचे तिकीट काढण्यासंदर्भात विचारणा केली. यासंदर्भातील एक प्रमोकोड तिला दिला. परंतु तो प्रमोकोड चुकीचा होता. त्यामुळे तिकीट बुक झाले नाही. मग त्या व्यक्तीने तुमचे तुकीट आम्ही करतो, तुम्ही तिकीटाचे 16,560 रुपये पाठवा. त्या महिलेने गुगल पेवरुन ही रक्कम पाठवली. परंतु त्यानंतर त्या सर्व व्यक्ती संपर्काबाहेर गेल्या. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी भारतीय दंड विधान 419, 420 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.