पुणे विमानतळावर मोठा अपघात झाला. एअर इंडियाच्या विमानात १६० प्रवासी बसले होते. विमान दिल्लीसाठी निघणार होते. परंतु अचानक मोठा आवाज आला. विमानात बसलेल्या प्रवाशांमध्ये घबराहट निर्माण झाली. पुणे विमानतळावरुन दिल्लीकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला ‘पुश बॅक टग’ (विमान ओढणे किंवा ढकलण्याचे वाहन) वाहनाची धडक बसल्याने अपघात झाले. या अपघातामध्ये विमानाचे मोठे नुकसान झाले.
एअर इंडिया फ्लाइट क्रमांक एआय ८५८ पुणे विमानतळावरुन गुरुवारी दुपारी ४ वाजून १० मिनिटांनी दिल्लीसाठी जाणार होते. विमानात प्रवाशी बसले. त्याचवेळी विमान टॅक्सी ट्रॅकवरून धावपट्टीच्या दिशेने जाण्याआधीच त्याला ‘पुश बॅक टग’ची जोरदार धडक बसली. त्या धडकेमुळे मोठा आवाज आला. विमानाचे मोठे नुकसान झाले. विमानाला भगदाड पडले. विमानाच्या पुढच्या टायरचे आणि पंखाच्या पत्र्याचे नुकसान झाले. त्यामुळे दिल्लीकडे जाणारे एअर इंडियाचे हे उड्डाण रद्द करण्याचा प्रसंग एअर इंडियावर आला. यामुळे विमानतळावर आलेल्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
विमानच्या अपघातामध्ये विमानाचा पंखा, टायरचे नुकसान झाले आहे. विमानाच्या पंख्यामध्ये इंधन असते. त्याने पेट घेतली असती तर मोठा अनर्थ पुणे विमानतळावर घडला असता. परंतु सुदैवाने हा अनर्थ टळला. या प्रकारामुळे विमानतळावरील सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. ही गंभीर घटना आहे. भविष्यात अशा घटना घडू नये, यासाठी वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे. मागील आठवड्यात पुणे विमानतळावर अपघाताची घटना घडली होती. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या विशेष विमानाचा अपघात झाला होता. त्यांना घेऊन जाणाऱ्या विमानाला इंडिगो कंपनीच्या विमानाच्या शिडीची धडक बसली.
पुश बॅक टगवरचे ऑपरेटरचे नियंत्रण सुटले. त्यामुळे पुश बॅक टग सरळ एअर इंडियाच्या विमानाला धडकले. त्यानंतर मोठा आवाज झाला. विमानात बसलेल्या सर्वांना काय झाले ते काळाले नाही. विमानाचा पायलट खाली उतरल्यावर त्याने पाहणी केली. त्यानंतर प्रकार लक्षात आला.