पुणे | 14 सप्टेंबर 2023 : पुणे येथील पुरंदर विमानतळ सुरु करण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. त्याचवेळी लोहगाव विमानतळावर विविध सुविधा सुरु केल्या जात आहेत. लोहगाव विमानतळावर रन वे लायटिंगचे काम केल्या गेल्यामुळे २४ तास विमानवाहतूक सुरु झाली. हे विमानतळ २४ तास खुले झाल्यामुळे पुण्यावरुन जाणाऱ्या विमानाच्या फेऱ्या वाढल्या आहेत. त्यामुळे प्रवासी संख्याही वाढली. पुणे विमानतळासाठी आता नवीन सुविधा निर्माण होत आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून म्हणजेच (AAI) देशातील चार ठिकाणी नवीन सुविधा तयार केली जात आहे. त्यात पुणे शहराचा समावेश आहे. चेन्नई, कोलकाता, गोव्यात अशी सुविधा सुरु होत आहे. विमानतळावर आता फुल बॉडी स्कॅनर लावण्यात येणार आहे. त्यासाठी एएआयकडून मंजुरी मिळाली आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. प्रवाशांची सुरक्षा तपासणी कमी वेळेत होणार आहे.
केंद्र सरकारने जुलै महिन्यात स्कॅनर खरेदी करण्यासाठी टेंडर काढले होते. त्यामुळे आता देशातील चार विमानतळावर स्कॅनर बसवले जाणार आहेत. तसेच विमानतळावर एक हजार कोटी पेक्षा जास्त गुंतवणुकीतून हॅन्ड बॅग स्कॅनर घेण्यासाठी टेंडर काढण्यात येणार होते. परंतु पीआयबीची मंजुरी न मिळाल्यामुळे हे टेंडर परत घेण्यात आले. 500 कोटी पेक्षा जास्त रक्कमेच्या टेंडरसाठी पीआयबीची मंजुरी लागते.
देशातील 43 विमानतळावर 131 फुल-बॉडी स्कॅनर आणि 600 हॅण्ड बॅग्स स्कॅनर होते. त्यासाठी एक हजार कोटी रुपये खर्च येणार होता. अमृतसर, गोवा, श्रीनगर, जम्मू, लेह, वाराणसी, चेन्नई, पुणे, कोलकाता, रायपूर, तिरूपती, भोपाळसह अन्य शहरांमधील विमानतळावर हे लावण्यात येणार होते. परंतु पहिल्या टप्प्यात देशातील चार विमानतळावर फुल बॉडी स्कॅनर आणि हॅण्ड बॅग्स स्कॅनर लावण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात इतर विमानतळाचा समावेश केला गेला. पुणे, चेन्नई, कोलकाता, गोवा विमानतळावर प्रवाशांची संख्या जास्त असल्यामुळे आधी याठिकाणी स्कॅनर बसवले जात आहेत.