पुणे | 8 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहराचे नवीन विमानतळ पुरंदर येथे उभारण्याचा हालचालींना वेग आला आहे. पुरंदर विमानतळासाठी जमीन संपादीत करण्याचे आदेश प्रशासनकडे आले आहे. पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ होणार आहे. त्याचवेळी पुणे लोहगाव विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे काम पूर्ण होत आले आहे. या टर्मिनलच्या उद्घाटन समारंभास पंतप्रधान नरेंद्र मोदी येण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुण्यातून विमान उड्डानांची संख्याही वाढणार आहे.
पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. येत्या महिन्याभरात नवीन टर्मिनलवरुन विमानांचे उड्डाण होणार आहे. टर्मिनलची थोडी काम राहिली असून ती आठ ते पंधरा दिवसांत पूर्ण होणार आहे. सध्या नवीन टर्मिनलवरुन सायनेज बोर्ड, टर्मिनलच्या बाहेर पडणाऱ्या रस्त्याचे काम अपूर्ण आहे. विमानतळावरील सर्व कामे पूर्ण झाल्यावर प्रवाशांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सेवा मिळणार आहेत.
विमानतळाचे नवीन टर्मिनल पूर्ण झाल्यावर पुण्यावरुन जाणाऱ्या विमानांची संख्या वाढणार आहे. दररोज जवळपास 120 विमाने या ठिकाणावरुन टेक ऑफ आणि लॅण्डींग होऊ शकतील. नव्या टर्मिनलच्या उद्घाटनाची तारीख अद्याप ठरली नाही. परंतु यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन टर्मिनलवरील सर्व कामे पूर्ण झाली आहे. काही किरकोळ कामे असून ती काही दिवसांत पूर्ण होणार आहे. त्यानंतर महिन्याभरात प्रवाशांना नवीन विमानतळावरुन जात येणार आहे.
नवीन टर्मिनलच्या माध्यमातून महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन होणार आहे. या ठिकाणी कोल्हापुरातील भवानी मंडप, न्यू पॅलेस याची प्रतिकृती तयार होत आहे. तसेच पुण्यातील शनिवार वाडा, पुण्यातील गणेशोत्सव ही चित्रे रेखाटली जात आहे. नवीन टर्मिनलचे काम पूर्ण झाल्यावर विविध शहरांसाठी विमान सेवा सुरु होणार आहे. यामुळे पुणे शहरात देशभरातून आलेल्या लोकांना काही तासांत आपल्या गावी जाता येणार आहे. नवीन टर्मिनलमुळे पुण्याचा विकासात अधिकच भर पडणार आहे.