पुणे | 15 सप्टेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंड पुकारला. शरद पवार यांच्याविरोधात भूमिका घेत अजित पवार यांनी आपला प्रवास सुरु केला. अजित पवार भाजप-शिवसेनेसोबत सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर अजित पवार गटातील आमदारांवर कारवाई करण्याची प्रक्रिया शरद पवार गटाकडून सुरु झाली आहे. तसेच शरद पवार स्वत: अजित पवार गटातील आमदारांच्या मतदार संघात जाऊन सभा घेत आहेत. या सर्व राजकीय पार्श्वभूमीर अजित पवार आणि शरद पवार शुक्रवारी पुन्हा एकत्र येणार होते. परंतु अजित पवार यांनी एकत्र येणे टाळले.
शरद पवार आणि अजित पवार मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या (व्हीएसआय) बैठकीनिमित्त एकत्र येणार होते. व्हीएसआयच्या संचालक मंडळाची बैठक शुक्रवारी होणार आहे. बैठकीला व्हिएसआयचे अध्यक्ष शरद पवार आणि संस्थेचे संचालक आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित राहतील, असा अंदाज होता. राज्यातील सत्तांत्तर झाल्यानंतर प्रथमच सार्वजनिक व्यासपीठावर दोन्ही पवार एकाच व्यासपीठावर येणार होते. परंतु अजित पवार यांनी बैठकीला जाणे टाळले आणि दौंडच्या दिशेने रवाना झाले.
शरद पवार आणि अजित पवार १२ ऑगस्ट रोजी एकत्र येणार होते. साखर कारखाना महासंघाच्या वतीने साखर कारखानदारांसाठी कार्यशाळा त्यावेळी आयोजित केली होती. परंतु त्याच दिवशी पुण्यातील चांदणी चौक पुलाचे उद्घाटन होते. त्यामुळे अजित पवार आले नाही. परंतु शरद पवार आणि अजित पवार गटातील मंत्री दिलीप वळसे पाटील एका व्यासपीठावर आले होते. त्यानंतर दोघांना एकत्र येण्याची आता संधी होती. परंतु अजित पवार यांनी एकत्र येणे टाळले.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर शरद पवार आणि अजित पवार सार्वजिनक व्यासपीठावर एकत्र आले नाही. द्राक्ष बागाईतदार संघाच्या वार्षिक कार्यक्रमाचे उद्घाटन २७ ऑगस्ट रोजी शरद पवार यांच्या हस्ते वाकड येथे झाले होते. त्यावेळी अजित पवार दुसर्या दिवशी गेले. त्यामुळे त्या ठिकाणी एका परिवारातील हे दोन्ही राजकीय नेते एकत्र आले नाही.