पुणे | 21 जुलै 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसमधून शरद पवार यांच्यापासून वेगळी भूमिका घेत अजित पवार यांनी बंड पुकारले. अजित पवार यांच्यासह नऊ जण शिवसेना-भाजप युतीच्या सरकारमध्ये मंत्री झाले. यावेळी त्यांच्यासोबत जवळपास ४० आमदार असल्याचा दावा केला जात आहे. या आमदारांनी विकासासाठी आपण अजित पवार यांच्यासोबत आल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यानुसार अजित पवार यांनी त्यांना गिफ्ट दिले आहे. पुणे जिल्ह्यातील दोघ आमदारांना गिफ्ट मिळाले आहे.
पुणे जिल्ह्यातील खेडचे येथील आमदार दिलीप मोहिते पाटील आणि आंबेगाव येथील आमदार दिलीप वळसे पाटील यांन अजित पवार यांची साथ घेतली. यावेळी आपण आपल्या मतदार संघाच्या विकासासाठी अजित पवार यांच्यासोबत सत्तेत सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले. आता या दोघांना त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे गिफ्ट मिळाले आहे.
विकासासाठी अजित पवार यांची साथ दिल्याचे दिलीप वळसे पाटील यांनी जाहीरपणे सांगितले. आता अजित पवार यांनी आंबेगाव तालुक्याला आदिवासी भागाच्या विकासासाठी भरुभरुन निधी त्यांना दिला आहे. दिलीप वळसे यांच्या मतदार संघात 29 कोटी 80 लाखांचा निधी आदिवासी भागाच्या विकासासाठी, तर बिगर आदिवासी भागाच्या विकासासाठी 25 कोटींचा निधी दिला आहे. तसेच खेड तालुक्याला पश्चिम पट्ट्याच्या विकासासाठी दिलीप मोहिते यांना 25 कोटींचा निधी दिला. पावसाळी अधिवेशनात 80 कोटींचा निधी अजित पवार यांनी दिला आहे. पुरवणी मागण्यांमध्ये हा निधी मंजूर झाला आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. यामुळे या लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी पाच आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. हे सर्वच जण अजित पवार यांचे खंदे समर्थक आहेत. आमदार दिलीप मोहिते तर अजित पवार यांच्या मागे नेहमी भक्कमपणे उभे असतात. २०१९ मध्ये झालेल्या पहिल्या पहाटेच्या शपथविधीच्या वेळी ते अजित पवार यांच्यासोबत होते. दिलीप वळसे यांना शरद पवार यांचे मानसपूत्र म्हटले जात होते. परंतु त्यांनी विकासासाठी आपण अजित पवार यांच्यासोबत असल्याची भूमिका घेतली.