पुणे : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रभावशाली काम करणाऱ्या प्रतिभावान देशातील 75 युवकांचा सन्मान ब्रिटिश कौन्सिल व नेशनल इंडियन स्टुडंट अँड अलूमनी युनियन माध्यमातून लंडन येथे करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील सातारा येथील प्रवीण निकम याचा सन्मान करण्यात आला आहे. लंडनमध्ये उच्च शिक्षण घेतल्यांनंतर प्रवीण सध्या समता सेंटर या संस्थेच्या माध्यमातून उच्च शिक्षणासाठी काम करत आहे. महाराष्ट्रातून प्रवीण निकम यांच्यासह चैतन्य मारपकवार, राजू केंद्रे, विवेक गुरव यांचा सन्मान लंडन येथे करण्यात आला आहे.
शिक्षक प्रशिक्षण, दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण संधीचे मार्गदर्शन, ५३ देशांच्या समिती असणाऱ्या राष्ट्रकुलचा प्रतिनिधी म्हणून काम आदींची दखल ब्रिटिश काऊंसील व नेशनल इंडियन स्टुडंट अँड अलूमनी युनियन यांनी घेतली.
मेहनतीने गाठले लंडन
मूळ साताऱ्यातील आसू पवारवाडीतील असणारे प्रवीण यांचे वडील नोकरीसाठी शेती सोडून पिंपरी-चिंचवडला स्थायिक झाले. वडील पिंपरीतील एका कंपनीत कामगार तर आई गृहिणी. आर्थिक संकटांना न घाबरता, दिवाळीतील उटणे, फिनेल विकून, जोडधंदे करून आपल्या मुलांचे शिक्षण चालू ठेवलं. पिंपरी-चिंचवडच्या कामगार वसाहतीत जेमतेम परिस्थितीत लहानाचा मोठा झालेल्या प्रविणने नामांकित चेवेनिंग शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शिक्षणासाठी थेट लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सपर्यंत गरुडझेप घेतली.
भारतातील तरुणाईला उच्च शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी प्रवीणने समता केंद्राची स्थापना केली. समता केंद्र ही नुसती शिक्षणावर काम करणारी संस्था नाही तर नेतृत्व, कौशल्य निर्माण करणार एक केंद्र बनत आहे. योग्य मार्गदर्शनाअभावी विद्यार्थ्यांना चांगल्या विद्यापीठांमध्ये अर्ज करता येत नाहीत.
आर्थिक अडचणी किंवा प्रवेश प्रक्रिया किंवा शिष्यवृत्तीची माहीत नसते. हीच असमानता ज्ञानाने दूर करून प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये बहुजन तृतीयपंथी व दुर्बल तरुणाईला प्रतिनिधित्व कसं मिळेल यासाठी समता सेंटर काम करत आहे. कौशल्य विकास कार्यक्रमही राबवत आहे. तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षणातील विषमता संपवून भारत आणि जागतिक प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमध्ये प्रतिनिधित्व मिळावे आणि भारतातील शिक्षकांचा क्षमता विकास या दोन पातळीवर रचनात्मक काम तो करीत आहे.
राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला
नेहरू युवा केंद्र व राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून प्राविणने युवकांचे समाजाभिमुख संघटन उभे केले. यासाठी त्याला भारत सरकारचा प्रतिष्ठित राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळाला आहे. २०१६ मध्ये डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ झांबियाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राष्ट्रकुल निवडणूक निरीक्षक म्हणूनही त्याने काम केले, हे विशेष. संयुक्त राष्ट्राचे उपमहासचिव अमिना मोहंमद आणि नॉर्वेच्या पंतप्रधान एर्ना सोलबर्ग यांनी त्यांच्या सार्वजनिक भाषणांमध्ये प्रवीणच्या कार्याचे कौतुक केले आहे.गेल्या १० वर्षांपासून सातत्याने कार्यरत असलेल्या प्रवीणचा लंडनमध्ये होणारा गौरव ही बाब महाराष्ट्रासाठी निश्चितच अभिमानास्पद ठरते.