पुणे | 22 जुलै 2023 : पुणे शहरात उच्चशिक्षित तरुणांची फसवणूक करण्याचा प्रकार अष्टविनायक फर्मकडून करण्यात आला होता. थकलेले कर्ज फेडण्यासाठी कर्ज टॉपअप करण्याच्या या प्रकारात २०० तरुणांची फसवणूक झाली होती. कर्ज मिळवून देणाऱ्या अष्टविनायक फर्मचा मालक सेल्वा नादर याने कर्जाचे पैसे आपल्या कंपनीत गुंतवण्यास लावले. मग कंपनी बंद करुन तो पसार झाला. या प्रकरणात २६ जणांनी पोलिसांकडे तक्रार गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. परंतु मुख्य आरोपी नादर फरार आहे.
पोलिसांनी या प्रकरणात शुक्रवारी न्यायालयात माहिती दिली. सहा महिन्यांपासून फरार असलेला सेल्वा नादर हा फरार होण्यापूर्वी कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यास भेटला होता. पोलिसांनी नादर आणि कंपनीचे फायनान्स मॅनेजर प्रसाद शिंदे यांची भेट झाल्याचे म्हटले आहे. प्रसाद शिंदेकडून नादरसंदर्भात अधिक माहिती मिळू शकते, असा दावा पोलिसांनी केला. त्यानंतर २५ जुलैपर्यंत आरोपींना पोलीस कोठडी दिली गेली.
पुणे पोलिसांनी या प्रकरणी अष्टविनायक फर्मचे फायनान्स मॅनेजर प्रसाद शिंदे (वय ३०), अजय खडसे आणि नितीन शिंदे यांना अटक केली आहे. ऑगस्ट २०२० ते फेब्रवारी २०२३ पर्यंत घडलेल्या या आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणात सेल्वा नादर मुख्य आरोपी आणि मास्टरमाईंड आहे. पोलिसांनी खडसेकडून कर्ज घेण्याच्या प्रक्रियाची माहिती घ्यावी लागणार असल्याचे न्यायालयात सांगितले. ग्राहकांचा डेटा खरेदीसंदर्भात नितीन शिंदे याची चौकशी करावी लागणार असल्याचा दावा पोलिसांनी. या प्रकरणी दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने तिघांची पोलीस कोठडीची मुदत वाढवली.
अष्टविनायक इन्व्हेस्टमेंटमध्ये ऑगस्ट २०२० ते नोव्हेबर २०२२ दरम्यान नादर याने ठेवी ठेवण्यास सांगितले. त्यासाठी बँकाकडून कर्ज त्याने त्या तरुणांना मिळवून दिले. त्या कर्जाची रक्कम अष्टविनायक फर्ममध्ये ठेवी ठेवण्यास लावल्या. या ठेवीसाठी चांगला परतावा दिला. त्यांचा कर्जाचा हप्ता भरण्यास दर महिन्याला रक्कम दिली जात होती. त्यानंतर नोव्हेंबर २०२२ पासून ही रक्कम देणे बंद झाले. मग २२ फेब्रुवारी २०२३ रोजी नादर कार्यालय बंद करुन पळून गेला.