पुणे : पिंपरी चिंचवड आणि कसबा मतदारसंघात पोटनिवडणुकीची रणधुमाळी संपली. २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत उमेदवारी दाखल झाल्यापासून कोणत्या उमेदवाराने किती खर्च केला त्याचा तपशील आलाय. चिंचवड मतदारसंघातील निवडणूक रिंगणात २८ उमेदवार आहेत. परंतु भाजप उमेदवार अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत होत आहे. या तिन्ही उमेदवारांनी प्रचारासाठी चांगलाच खर्च केला आहे. खर्च करण्यात राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांनी आघाडी घेतली आहे तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनीही मोठा खर्च केलाय.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्ष व शिवसेनाची युती आहे. या युतीकडून दिवगंत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिलीय. उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने नाना काटे यांना उमेदवारी दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनीही निवडणुकीत रंगत आणलीय. या निवडणुकीत या प्रमुख उमेदवारांसह सर्वच उमेदवारांनी आपला प्रचार खर्च जाहीर केला आहे. त्यानुसार सर्वाधिक खर्च राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांनी केला आहे.
कोणी किती केला खर्च
राष्ट्रवादीचे विठ्ठल उर्फ नाना काटे २५ लाख ५९ हजार ५९६ लाखांचा खर्च केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या अश्विनी जगताप यांनी २४ लाख २३ हजार ९१४ प्रचार खर्च दाखवला आहे. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी चांगलाच खर्च केला आहे. त्यांनी प्रचारासाठी २२ लाख ५७ हजार ९८७ रुपये खर्च करुन निवडणुकीच्या रणांगणात आपणही असल्याचे दाखवून दिलेय. सर्वात कमी खर्च अपक्ष उमेदवार चंद्रकांत मोटे यांनी केला आहे. त्यांनी केवळ ५ हजार ९०६ रुपये खर्च केला आहे. एकूण सर्व उमेदवारांनी मिळून १४ कोटी १० लाख ९६ हजार रुपये खर्च केला आहे.
सट्टेबाज सक्रीय
या निवडणुकीसंदर्भात सट्टेबाजांकडून निकालाबाबत अंदाज लावले जात आहेत. त्यासाठी झालेल्या प्रत्येक सभा, बैठक, रॅली याकडे सट्टेबाजांचे लक्ष ठेवले आहे. कोणाला किती प्रतिसाद मिळाला, त्यानुसार संबंधित उमेदवाराचा सट्टाबाजारातील ‘भाव’ ठरत आहे. जो उमेदवार विजयी होणार त्याला कमी भाव तर पराभूत होणाऱ्या उमेदवाराला जादा भाव सट्टेबाजांकडून दिला जातो.
प्रचारात सुरू झालेला हा सट्टा बाजार मतदानाचा दिवस व मतमोजणीच्या शेवटच्या क्षणापर्यंत तेजीत असतो. क्षणाक्षणाला अंदाज बदलत असतात. त्यानुसार सट्टाबाजारातील उलाढाल होत असते.