अभिजीत पोते, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, बारामती, पुणे | 18 फेब्रुवारी 2024 : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामतीतून लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आज बारामतीत आहे. इथे माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी या निवडणुकीवर भाष्य केलं. कुणाला निवडणूक द्यायचं याचा निर्णय जनता घेईल. आमचं सगळं कुटुंब राजकारणात नाहीये. आमच्या कुटुंबाला तुम्ही राजकारणात कशाला आणता? अजितदादा बोलले असतील तर तुम्ही त्यांनाच विचारा…, असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी आगामी निवडणुकीवर भाष्य केलं.
निवडणूक हा काही भातुकलीचा खेळ नाही. माझं काम एका जागेवर आणि नाती दुसरीकडे… माझी नाती पवार, सुळे यांच्या पुरते मर्यादित नाही. अनेक नाती प्रेमाचे, विश्वासाचे असतात. नाती नेहमी राहतील पण माझी एक वैचारिक बैठक आहे, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आणि पवार कुटुंबातील नातेसंबंध यावर भाष्य केलं.
बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद भावजय लढत अटळ असल्याचं दिसतं आहे. बारामती मतदारसंघात दोन्ही उमेदवार पवार घराण्यातलीच असणार आहे, असं माहिती महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याचा टीव्ही 9 मराठीला दिली आहे. देशातील टॉप टेन लढती पैकी एक लढत बारामतीची असणार असल्याचंही ते म्हणालेत. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भावजय सुनेत्रा पवारच निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. महाविकास आघाडी विरोधात महायुती अशी लढत पाहायला मिळले, असं या नेत्याने टीव्ही 9 मराठीला सांगितलंय.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवारानंतर आता सुप्रिया सुळे यांचा विकास रथ ग्रामीण भागामध्ये फिरत आहे. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या विकास कामाचा रथ आता बारामती मध्ये फिरू लागला आहे. या रथाच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांनी संसदेमध्ये मांडलेले प्रश्न आणि केलेली कामे ही नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू आहे.