पुणे | 26 सप्टेंबर 2023 : पुणे शहर आणि परिसरात अपघात कमी करण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना सुरु केल्या आहेत. महामार्गावर कुठे ब्लॅक स्पॉट आहे, त्याचा शोध घेतला जात आहे. ब्लॅक स्पॉट शोधून अपघातांची कारणे शोधली जात आहेत. त्यासाठी पुणे बेंगळुरु महामार्गावर (Pune-Bengaluru highway) अपघाताचे ब्लॅक स्पॉट शोधण्यात आले. त्याठिकाणी अपघात वाहनधारकांकडून वाहतूक नियम मोडल्याने होत असल्याचे दिसून आले. यामुळे स्पीड रडार गन आणि डिस्प्ले लावण्यात आले.
पोलिसांनी पुणे-बेंगळुरु महामार्गावर स्वयंसेवी संस्था (NGO) कडून स्पीड रडार गन (Speed radar gun) आणि कनेक्टेड व्हीकल-एक्टिवेटेड स्पीड साइन (वीएएसएस) डिस्प्ले बसवला. परंतु चोरट्यांची नजर त्यावर गेली आणि त्यांनी ते लंपास केले. कात्रज आणि नऱ्हे दरम्यान हा प्रकार घडला. आता या प्रकरणी सिंहगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हाच भाग अपघाताचा ब्लॅक स्पॉट ठरला होता.
महामार्गाची देखभाल दुरुस्तीचे काम भारती विद्यापीठ आणि सिंहगड वाहतूक शाखेकडून केले जाते. आकडेवारीनुसार 2022 मध्ये या ठिकाणी 40 अपघात झाले. त्यात 44 जणांचा मृत्यू झाला. अपघात वेगाने गाडी चालवणे, न्यूट्रल करुन गाडी चालवणे यामुळे होत होते. त्यामुळे हा भाग ब्लॅक स्पॉट झाला होता. पुणे शहरातील इतर ठिकाणाच्या तुलनेत येथे जास्त अपघात होत होते.
केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाच्या मापदंडानुसार रस्त्याचे 500 मीटर पर्यंतचा भाग हा ब्लॅक स्पॉट होतो, ज्या ठिकाणी तीन वर्षांत पाच जणांचा मृत्यू अपघातात झाला आहे. सेव लाइफ फाउंडेशनकडून अपघात कमी करण्यासाठी पोलिसांना सहकार्य मिळत आहे. सेव लाइफ फाउंडेशन या ठिकाणी झालेल्या अपघाताचे विश्लेषण करत आहेत. तसेच त्यावर काय उपयायोजना करता येतील, त्यासंदर्भातील मार्गदर्शन करत आहे. परंतु चोरट्यांनी या ठिकाणी असलेल्या स्पीड रडार गन आणि कनेक्टेड व्हीकल-एक्टिवेटेड स्पीड साइन डिस्प्लेची चोरी केली आहे.