योगेस बोरसे, पुणे : भारतीय जनता पक्षाची प्रदेश कार्यकारणीची बैठक पुण्यात गुरुवारी झाली. या बैठकीत मार्गदर्शन करताना देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच जोश भरला. त्याच वेळी उद्धव ठाकरे गटाकडून नकारात्मक प्रचार होत असल्याचे सांगत त्यांच्यांवर जोरदार हल्ला केला. सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरे यांनी आठ मागण्या केल्या होत्या? त्यापैकी कोणती मागणी मान्य झाली? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला. पोपट मेला आहे, हे उद्धव ठाकरे यांना कोणीतरी सांगावे, असे त्यांनी म्हटले आहे.
वाचून दाखवल्या मागण्या
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आपल्याच बाजूने लागल्याचा प्रचार उद्धव ठाकरे यांच्यांकडून केले जात आहे. उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आठ मागण्या केल्या होत्या, त्यापैकी त्यांची कोणती मागणी मान्य झाली? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला. यावेळी त्यांनी आठ मागण्या वाचून दाखवल्या.
ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरुन हटवा, विधानसभा अध्यक्षाची निवड रद्द करा, ३ जुलैचा विश्वासदर्शक ठराव रद्द करा, एकनाथ शिंदे आणि आमदारांविरुद्ध विधानसभा अध्यक्षांकडे असलेली याचिका तुमच्याकडे बोलवा, ३ जुलै रोजी पाठवलेले पत्र रद्द करा, घटनेच्या दहाव्या सूचीप्रमाणे विधानसभा अध्यक्षांनी बजावले समन्स रद्द करा, अशा मागण्या उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाने केले होत्या. त्यापैकी एकही मागणी त्यांची मान्य झाली नाही. मग त्यांच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयाच्या निकाल त्यांच्या बाजूने कसा लागला? असा सवाल त्यांनी केले.
सरकार कार्यकाळ पूर्ण करणार
शिंदे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेन आणि पुढे सुद्धा निवडून येणार असल्याचा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. कर्नाटकमध्ये 700 पेक्षा कमी मतांनी पडलेले उमेदवार 5 आहेत. तसेच 2 ते तीन हजार मतांनी पडलेले उमेदवार 42 आहे. यामुळे त्यापासून आपण धडा घेऊन बुथ समक्ष केला पाहिजे. कर्नाटक निकालानंतर उड्या मारत आहेत, मात्र त्याचवेळी सर्वात मोठ्या उत्तर प्रदेशातील सर्व महापालिका भाजपने जिंकल्या, त्यावर चर्चा होत नाही.
एक वर्ष समर्पण द्या
आज भाजप आणि सेनेची युती भक्कम आहे. दुसरीकडे फक्त शिल्लक सेना आहे. शिल्लक सेना महाविकास आघाडीकडे आहे. येत्या निवडणुकीत महापालिका, लोकसभा, विधनासभा, निवडणुकीत आपणच जिंकणार आहोत. या लोकांकडून नकारात्मक प्रचार केला जात आहे. परंतु आपण जिंकणार, याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. आता पुढचे सहा महिने महत्वाचे आहेत. त्यासाठी एका वर्षाचे समर्पण कार्यकर्त्यांनी पक्षाला द्यावे. मी ही देण्यास तयार आहे. हे समर्पण मोदींच्या कार्यासाठी, देशासाठी असणार आहे.