पुणे : पुणे शहरात भारतीय जनता पक्ष (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत. पुणे शहरावर वर्चस्व मिळवण्यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरु असतात. नुकतीच पुणे शहरातील कसबा व पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपला कसबाचा गड गमावला. भाजपच्या या पराभवानंतर पक्षात मोठे फेरबदलाचे संकेत मिळाले आहे. पुणे शहरातील भाजपची संघटनात्मक रचना बदलण्यात येणार आहे. येत्या १५ मे पूर्वी हा बदल करण्यात येणार आहे.
काय आहे बदल
भारतीय जनता पक्षाने पुणे जिल्ह्यावर विशेष लक्ष दिले आहे. यामुळे पुणे जिल्ह्याला भाजप दोन जिल्हाध्यक्ष देण्याची तयारी सुरु केली. पुणे जिल्ह्यात संघटनेत बदल करण्याचे संकेत भाजपकडून मिळाले आहे. त्यासाठी पक्षाकडून जिल्ह्यात पक्ष बांधणीला सुरूवात झाली आहे. आता आगामी जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप जिल्ह्यात पक्ष बांधणी करणार आहे.
काय बदल करणार
पुणे जिल्ह्यात भाजपकडून उत्तर आणि दक्षिण असे दोन विभाग करत दोन जिल्हाध्यक्ष देण्याची तयारी सुरु केली आहे. येत्या 15 मे नंतर पुणे जिल्ह्यात भाजपच्या नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. नवीन रचनेत शहरात देखील भाजप देणार नव्या चेहऱ्याना संधी देणार असल्याचे म्हटले जात आहे.
शहर कार्यकारणीत बदल
पुणे शहर भाजपच्या कार्यकारिणीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. पुण्याला नवीन शहराध्यक्ष मिळणार? की भाजप पुन्हा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनाच संधी देणार हे पाहणं महत्वाचं असेल. पुणे शहर ,जिल्हा कार्यकारिणीची दर तीन वर्षांनी नियुक्ती होते. मुदत संपली असल्यानं ही निवड होणार आहे. शहराध्यक्ष पदासाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, गणेश बीडकर, धीरज घाटे आणि माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची नावं चर्चेत आहेत. त्यामुळे पक्षनेतृत्व कुणाला संधी देणार? हे पाहणं महत्वाचं असेल.
प्रदेश कार्यकारणीत बदल
भाजप प्रदेश कार्यकारिणीत झालेल्या मोठ्या फेरबदलाची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे करणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या नव्या भाजप प्रदेश कार्यकारिणी कोणाची वर्णी लागू शकते तर कोणाला डच्चू मिळू शकतो, याकडे साऱ्याचे लक्ष लागून आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांची नवी भाजप प्रदेश कार्यकारिणी तयार झाली आहे. तर या आठवड्यातच या नव्या टीमची घोषणा देखील भाजपकडून करण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय.त्यात अनेक जिल्ह्यातील अध्यक्षांचे खांदे पालट करण्यात येणार आहे आणि भाजप प्रदेश कार्यकारिणीत नवे चेहरे दिसणार आहेत.