पुणे | 1 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहरात काळ्या जादूने पैसे कमवण्याचा प्रकार समोर आला आहे. 20 लाख रुपये द्या, त्याचे पाच कोटी करुन देतो, असा हा प्रकार आहे. वीस कोटी रुपये कमवण्यासाठी एकाने प्रयत्न सुरु केले. 500 रुपयांच्या नोटा असलेले 40 बंडल तयार ठेवले. काळी जादू करण्यासाठी हे बंडल एका टाकीत टाकण्यात आले. त्यानंतर असे काही घडले की त्यांना पश्चात्ताप करण्याची पाळी आली. शेवटी हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले.
पुणे शहरातील 42 वर्षीय महिला अमृता संतोष मुशिया या नारायण पेठेत राहण्यास आल्या आहेत. त्यांचे व्यावसायिक भागीदार अंकितकुमार पांडे आहे. पांडे यांची तनवीर पाटील याच्याशी ओळख झाली होती. तनवीर हा जमीन खरेदी व्यवहार करणारा आरोपी आहे. तनवीर पाटील याने आणखी तीन जणांशी पांडे यांची ओळख करुन दिली. हे तिघे म्हणजे शिवम गुरुजी, सुनील राठोड आणि आनंद स्वामी आहे. या लोकांनी तनवीर पांडे, राजपाल जुनेजा आणि फिर्यादी महिलेला गाठले. त्यांना काळ्या जादूने वीस लाख रुपयांचे पाच कोटी रुपये देण्याचे आमिष दाखवले.
महिलेची भेट 9 ऑगस्ट रोजी आनंद स्वामी याच्यासोबत झाली. भगवे वस्त्र परिधान केलेल्या या भोंदूबाबाने वीस लाखांचे पाच कोटी करण्यासाठी एक विधी करावा लागणार असल्याचे सांगितले. त्यासाठी महिलेने पैशांची जमवाजमव केली. 13 सप्टेंबर रोजी आरोपी महिलेच्या घरी आले. त्यांनी विधी सुरु करण्यासाठी एका रिकाम्या टाकीत 20 लाख रुपये टाकण्यास सांगितले. पैसे टाकीत टाकल्यावर आरोपींनी खोलीत धूर केला. आता पुढचा विधी हरिद्वार येथे जाऊन करतो, असे सांगत टाकीत टाकलेले 20 लाख रुपये घेऊन आरोपी फरार झाले.
महिलेने त्यानंतर आरोपींना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नव्हता. त्यानंतर
तनवीर पाटील, शिवम गुरुजी, सुनील राठोड आणि आनंद स्वामी यांच्याविरोधात तक्रार देण्यात आली. विश्रामबाग पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 9 ऑगस्ट ते 25 सप्टेंबर या कालावधीत घडली आहे.